Join us

मराठवाड्यात ‘सामान्यहून कमी’! राज्यात पुढील ४ दिवसात तापमानात होणार बदल

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 06, 2024 10:26 AM

रखरख कमी झाली असून मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांना आता मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे.

रखरखते मराठवाडी ऊन असे बिरूद मिरवणाऱ्या मराठवाड्यात काल सामान्यहून कमी तापमानाची नोंद झाली. येत्या तीन ते चार दिवसात मान्सून राज्यात दाखल होणार असून उन्हाच्या चटक्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. सध्या राज्यभर पूर्वमोसमी पावसाची ढग घोंगावत असून विदर्भातील दोन-तीन जिल्हे वगळता बहुतांश ठिकाणी तापमानात काही अंशी घट झाल्याचे हवामान विभागाने नोंदवले.

काल राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस झाला. दरम्यान, उत्तर कोकणात ३६ ते ३८ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली. हे तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत चढे होते. मध्य महाराष्ट्रात तापमान सामान्य होते. तर विदर्भात ३६ ते ४१ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली.

दुपारच्या वेळी साधारण ४५ अंशांपर्यंत जाणारे मराठवाड्यातील तापमान आता हळूहळू घसरू लागले आहे. सायंकाळी सुर्यास्तापर्यंत जाणवणारा उष्माही आता अल्हाददायक वाटू लागला आहे. मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांना आता मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे.

कोणत्या जिल्ह्यात कसा होता पारा?

हवामान विभागाने नोंदवलेल्या तापमानाच्या पाऱ्यानुसार काल जालन्यात ३५ अंशांची नोंद झाली. लातूरमध्ये ३६.६ अंश तर धाराशिवमध्ये ३७.४ अंश तापमानाची नाेंद झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ३८ अंश तापमान होते. नांदेड ३८.२ तर परभणी ३९.३ अंशांची काल नोंद करण्यात आली.

टॅग्स :तापमानहवामानमराठवाडामोसमी पाऊस