Join us

मराठवाड्यात तापमान आणखी घसरणार, कशी घ्याल पिकांची काळजी?

By मुक्ता सरदेशमुख | Published: December 22, 2023 7:00 PM

तूती उद्योगासह, भाजीपाल्याला वाचवा..

मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहून, पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात किंचित वाढ होऊन त्यानंतर पुढील तीन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहून, पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात किंचित वाढ होऊन त्यानंतर पुढील तिन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 22 ते 28 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी व दिनांक 29 डिसेंबर ते 04 जानेवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 27 डिसेंबर ते 02 जानेवारी 2024 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा, करडई व हळद पिकास हलके पाणी द्यावे. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. 

हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जमीनीवर फवारणी करावी किंवा आळवणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल 70 डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकास फुटवे फुटण्याच्या आवस्थेत पाणी द्यावे.  11 ते 12 महिन्याचा ऊस लोळला असल्यास लवकरात लवकर तोडणी करून कारखान्यात पाठवावा. 

हळद पिकातील पानावरील ठिपके या रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4 एस सी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  स्टिकरसह फवारणी करावी. हळद पिकातील कंद सड याच्या व्यवस्थापनासाठी मेटॅलॅक्झील 4% + मॅनकोझेब 64% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृगबहार धरलेल्या संत्रा/मोसंबी फळबागेत फळवाढीसाठी 00:00:50 1.5 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी व केळी बागेत रात्री सिंचन करावे. संत्रा/मोसंबी, द्राक्ष व केळी बागेत खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे केळी बागेत घड निसवले असल्यास केळीचे गुच्छ सच्छिद्र पॉलिथीन पिशव्याने झाकून (घडांना सर्क्टींग करावी). किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकास हलके पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

फुल पिकास हलके पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकांचे थंडी पासून संरक्षण करण्यासाठी संगोपनगृहात कोळशाची शेगडी किंवा ईलेक्ट्रानिक शेगडीचा वापर करावा. संगोपनगृहात कोळश्याचा धुर होणार नाही याची काळजी घ्यावी व तापमान 22 ते 28 अं.से. व आर्द्रता 80 ते 85 टक्के राहील याची काळजी घ्यावी. फांदी पध्दती मध्ये 20 टक्के मजुरीत बचत होते. कच्या संगोपन गृहात थंडी किंवा उष्णता मर्यादीत ठेवणे कठीण होते. म्हणून हळूहळू पक्के सिमेंट काँक्रेटचं संगोपनगृह बांधकाम करून घ्यावे. त्यामूळे रेशीम कीटक रोगास बळी पडत नाहीत. धुळीचा त्रास कमी होतो आणि कोषाच्या उत्पादनात वाढ होते. सीएसआर & टीआय म्हैसूर यांच्या शिफारसीनूसार संगोपनगृहाचा आकार असावा. खलच्या व वरील बाजूस झरोखे व मधील बाजूस खिडक्या असाव्यात म्हणजे हवा खेळती राण्यास मदत होते.

टॅग्स :हवामानतापमानशेती क्षेत्र