ढगाळ वातावरण कमी झाल्याने थंडी पुन्हा जाणवू लागली आहे. किमान तापमान १७ वरून खाली येण्यास सुरुवात झाली. मंगळवारी १५ अंश, बुधवारी १४, गुरुवारी १२ अंशावर तापमान खाली येत शुक्रवारी ७.५ अंशापर्यंत नीचांकी स्तरावर पोहोचले. उत्तर भारतातून गेल्या काही दिवसांपासून थंड गारवा महाराष्ट्रात येत असून, गारव्याने पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे.
शुक्रवारी औराद हवामान केंद्रावर ७.५ अंश किमान, तर कमाल २९ अंश तापमानाची नोंद झाली. औराद शहाजानी परिसरात मध्यंतरी वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले होते. काही ठिकाणी हलका पाऊस झाला. यावर्षी सतत ढगाळ वातावरण व धुके पडत राहिल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. उत्तरेकडे थंड वारा वाहू लागला असल्याने गारठा वाढून औराद शहाजानी परिसरातील तापमानाची या वर्षातील नीचांकी नोंद झाली असल्याचे औराद शहाजानी हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले.
मंडळ कृषी अधिकारी रणजित राठोड म्हणाले, बागेत सायंकाळी व पहाटे शेतकयांनी धूर करावा. शक्य असेल तर रात्री पाणी द्यावे. फळबागांना सल्फरच्या खताचा डोस द्यावा. दरम्यान, वाढत्या थंडीने औराद शहाजानीसह परिसरातील गावात थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटविल्या जात आहेत. उबदार उलनचे कपडे, कानटोपीचा वापर करून नागरिक थंडीपासून बचाव करत आहेत. लहान बाळ व वयस्कर नागरिकांना सकाळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.धुक्यात शोधावा लागतोय महामार्ग
वातावरणात बदल झाल्याने पहाटेपासून तेरणा काठासह औराद परिसरात धुक्याची चादर पसरत आहे. मागील आठवड्यात धुक्यात लातूर- जहिराबाद महामार्गावर वाहन चालकांना रस्ता शोधावा लागला होता.