मुंबई शहर आणि उपनगरातील थंडीचा कडाका अद्यापही कायम असून, शुक्रवारी माथेरान आणि मुंबईचे किमान तापमान अनुक्रमे १४.२, १६.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
विशेषत: रात्रीसह दुपारीही मुंबईत गार वारे वाहत असून, आता २३ जानेवारीपर्यंत मुंबईसह कोकणात पहाटेचे किमान तापमान १४ तर दुपारचे कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. ही दोन्हीही तापमाने सरासरी इतकी तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी असू शकतात. दक्षिण कोकणात कमाल तापमान वाढ ही एखाद्या डिग्रीने अधिक असणार आहे.
अधिक वाचा: उजनी धरण मृत साठ्यात जाणार; १० वर्षात तिसऱ्यांदा कमी पाणी पातळी
२३ जानेवारीपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, उत्तर सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे १०-१२ तर दुपारचे कमाल तापमान २६ अंश राहील. विदर्भ व मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यात २३ जानेवारीपर्यंत पहाटेचे किमान तापमान हे १४-१६ तर दुपारचे कमाल तापमान २८ राहील.
ही दोन्हीही तापमाने सरासरी इतकी तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक असू शकतात. विदर्भात २३ जानेवारीनंतर म्हणजे २५ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहून थंडी काहीशी कमी होईल. अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये अहमदनगर १२.४अलिबाग १५.२छत्रपती संभाजी नगर १२.८डहाणू १६.५जळगाव ११.३कोल्हापूर १६.१महाबळेश्वर १२.५मालेगाव १३.६माथेरान १४.२मुंबई १६.९नांदेड १७नाशिक १२.१धाराशिव १७.२पालघर १८.६परभणी १५.८रत्नागिरी १८.२सांगली १५.४सातारा ११.९सोलापूर १५.२