Join us

थंडीचा जोर वाढणार! पुढील पाच दिवस मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 17, 2024 9:51 AM

शेतकऱ्यांनी पिकाची काय काळजी घ्यावी? प्रादेशिक हवामान केंद्राने दिलाय कृषी सल्ला...

राज्यात मागील दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. पुढील पाच दिवस मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे.

वायव्य भारतात मागील २४ तासांपासून किमान तापमान वाढले असून पूर्व भारतात २ ते ३ अंशांची घट झाली आहे. उर्वरित देशात तापमानात फारसा फरक नसल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. 

दरम्यान मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात किंचित घट होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. 

शेतकऱ्यांनी पिकांची काय काळजी घ्यावी?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्यवस्थापन

  • कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. 
  • काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. 
  • गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 40 ते 45 दिवस) व पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी द्यावे.
  • उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी 15 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान करता येते. 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

  • केळी बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी 00:52:34 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
  • आंबा फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे. आंब्याच्या मोहरावरील भूरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी सल्फर 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी. 
  • दिवसाचे तापमान वाढल्याने द्राक्षांची पाण्याची गरज वाढणार आहे. मण्यांच्या विकासाचा टप्पा व तापमान लक्षात घेता मल्चचा वापर करावा तसेच बागेत संध्याकाळी किंवा सकाळी पाणी द्यावे. 

भाजीपाला

  • भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. 
  • टोमॅटो पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टॅग्स :हवामानमराठवाडातापमानशेती क्षेत्र