राज्यात यंदा थंडी राहणार असून ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान आणि कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबरच्या पुढे थंडी वाढेल असा अंदाज हवामान शास्त्रज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.
हिमालयाच्या कुशीत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रातदेखील उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत.त्यामुळे जळगाव जिल्ह्यात यंदा थंडीला सुरुवात झाल्याचे चित्र असून सोमवारी शहरातील किमान तापमान राज्यात सर्वात कमी १५ अंशांपर्यंत खाली आले होते.
यंदा पावसाच्या तऱ्हेमुळे राज्यात थंडीचे चित्र कसे असणार याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना थंडी पडणार का? तापमानात काय बदल होतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचे रात्रीचे तापमान १७ अंशावर होते. त्यापेक्षा २ अंशानी जळगावचे तापमान कमी म्हणजेच १५ अंशावर होते. दुसरीकडे दिवसाचे तापमान ३५ अंशावर असल्यामुळे दिवसा उकाडा जाणवत आहे.
एकीकडे दिवसा वाढती ऑक्टोबर हीट तर दुसरीकडे रात्री कमी होणारे तापमान अशी स्थिती सध्या राज्यात आहे. समुद्राच्या पाण्याच्या तापमान फारसा फरक दिसून येत नसल्याने थंडीवरही फारसा परिणाम जाणवणार नसल्याने यंदा थंडी राहणार असल्याचे डॉ साबळे म्हणाले.
तापमानाच्या चढउताराचा थंडीवर परिणाम होतो. दसऱ्यानंतर सकाळी सहा वाजताचे म्हणजेच सकाळच्या तापमानात घट होईल तर कमाल तापमान सरासरीएवढेच असेल.१५ नोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज साबळे यांनी वर्तवला आहे.
थंडी वाढणार हे कसे ठरवतात?
थंडी किंवा कोणतेही तापमानाच्या अंदाजाचे काही निकष असतात.समुद्राच्या पाण्यातील तापमान हे एकूण तापमानावर फार मोठा परिणाम करत असते. जवळपास १/३ जमिन आणि १/४ पाणी आहे. पाणी उशीरा तापते अन् उशीरा थंड होते. तर जमीनीचं गणीत याच्या उलट. जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. या नियमाप्रमाणे पाहिले तर समुद्राच्या पाण्याच्या तापमानाचा किती मोठा परिणाम होत असेल?
तापमान फार नसल्याने थंडीवर त्याचा परिणाम होण्याचे कारण नाही. बरेच लोक सांगताहेत की थंडी राहणार नाही. मात्र, बारकाईने पाहिल्यावर असे दिसून येते, की प्रशांत महासागरात आताचे तापमान ३१ अंश सेल्सियस आहे पण प्रत्यक्ष तपासल्यावर ते ३० अंश सेल्सियस असल्याचे दिसून येत आहे. म्हणजे आकडेवारी तपासल्यानंतर फार तापमानवाढ नाही हे कळते. असेही ते म्हणाले.