आपल्या निसर्गदत्त देणगीचा लाभ घेऊन अवघ्या महाराष्ट्राला वीज पुरविण्याचे काम करणारा पाटण तालुका देशाच्या नकाशावर एक 'पॉवरफुल्ल' परिसर म्हणून उदयास येत आहे.
कोयना प्रकल्पातून होणाऱ्या विजनिर्मितीबरोबरच आता आशिया खंडातील सर्वात मोठे 'पॉवर स्टेशन' म्हणून पाटणच्या पवनचक्की प्रकल्पाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांना चांगला मोबदला आणि अनेकांना नोकऱ्या देण्याचे कामही या परिसराने केले आहे.
गत चार ते पाच दशकांत कोयनेच्या पाण्यापासून झालेल्या वीज निर्मितीमुळे सिंचन आणि औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या रोजगार संधीमुळे महाराष्ट्राचा कायापालट झाला आहे.
कोयना प्रकल्पाची संकल्पना टाटा समूहाच्या मनात १९१० पासूनच मूळ धरून होती. तरीदेखील १९५६ नंतर मुख्यत्वे वीज निर्मितीसाठी असणारा हा प्रकल्प राज्य शासनाच्या विकासकामांतून आकार घेऊ लागला.
धरणाची उभारणी १६ जानेवारी १९५४ या तारखेला भूमिपूजन होऊन सुरू झाली. पहिल्या टप्प्यात कमी उंचीचे धरण बांधून चार जनित्रांद्वारे वीजनिर्मिती सुरू करायची, असा बेत होता. मात्र, पहिला टप्पा पूर्ण करण्याआधीच विजेची मागणी खूप वाढली.
त्यामुळे पहिला व दुसरा टप्पा सामायिकरित्या पूर्णत्वास नेण्यात आला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील पाणी वीजनिर्मितीनंतर पोफळीजवळ सोडण्यात येत होते. येथील उंची समुद्रसपाटीपासून १४० मीटर आहे.
एवढ्या उंचीवरही वीजनिर्मिती होऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर प्रकल्पाचा तिसरा टप्पा जन्मास आला. त्यासाठी अलोरे गावाजवळ कोळकेवाडी येथे वीजगृहात ४ जनित्रे बसविली आहेत. त्याद्वारे ३२० मेगावॅट वीजनिर्मिती होते.
वाढीव वीज मागणीच्या काळात जादा वीजनिर्मिती करून एरव्ही वीजनिर्मिती बंद ठेवल्यास तेवढ्याच पाणीसाठ्यात विजेची मागणी पुरविता येईल, या दृष्टीने आणखी एक नवे वीजगृह बांधण्यासाठी प्रकल्पाचा चौथा टप्पा उदयास आला. चौथ्या टप्प्यातून १०० मेगावॅट वीजनिर्मिती होऊ लागली.
धरणातून पूर्वेकडे पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगधंद्यासाठी पाणी सोडले जाते. हे पाणी सोडताना उंचीचा उपयोग करून वीजनिर्मिती शक्य व्हावी, यासाठी धरणाच्या पायथ्यात उजव्या तीरावर एक लहान विद्युतगृह निर्माण करण्यात आले आहे. यातून ४० मेगावॅट वीजनिर्मिती होते.
कोयना प्रकल्पातील पाण्याचा थेंबन् थेंब राष्ट्राला विजेची शक्ती देतो. १३ मार्च १९९९ हा दिवस कोयना धरणासाठी ऐतिहासिक म्हणावा लागेल. पाणीसाठ्याखालील जलविच्छेदनाचा आशिया खंडातील पहिला प्रयोग या दिवशी कोयना जलाशयात करण्यात आला.
हे सर्व चौथ्या टप्प्याच्या जलवहन प्रणालीसाठी जलाशयापासून सुरू होणाऱ्या बोगद्यासाठी करण्यात आले. २००५ साली पूरपरिस्थितीत प्रकल्पाच्या चारही टप्प्यांतून एका दिवसाला होणाऱ्या वीजनिर्मितीचा उच्चांक गाठण्यात आला. एका दिवसात ४ कोटी २७ लक्ष युनिट निर्माण करण्यात आली.
कोयना प्रकल्पाने आजपर्यंत महाराष्ट्राला हजारो कोटी युनिट वीज दिली आहे. कोयनेतील वीजनिर्मितीचा हिशेबही पाहणे मनोरंजक ठरेल. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातून एक अब्ज घनफूट पाण्यापासून सरासरी ३.४ कोटी युनिटस वीज निर्माण होते.
चौथ्या टप्प्यातून एक अब्ज घनफूट पाण्यापासून ३.८८ कोटी युनिट तयार होतात. तिसऱ्या टप्प्यात एक अब्ज घनफूट पाण्यापासून ९४.४ लक्ष युनिटस् निर्मिले जातात.
कोयना प्रकल्पामुळे वीजनिर्मितीत जिल्हा आघाडीवर असतानाच त्यामध्ये पवनऊर्जेमुळे मोठी भर पडली आहे. जिल्ह्याला लाभलेल्या डोंगररांगांमुळे पवनऊर्जा प्रकल्पासाठीही अनुकूल वातावरण मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे दोन हजार पवनचक्क्यांच्या माध्यमातून तब्बल दरमहा २० कोटी युनिट वीज तयार होत आहे.
- प्रवीण जाधव
पाटण