Join us

परतीच्या पावसाचा प्रवास वेगाने सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 9:49 AM

पुढील दोन ते तीन दिवसांत राज्याच्या दक्षिण मध्य भाग वगळता अन्य भागातूनही मान्सून परतेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणातून मान्सून येत्या १० ऑक्टोबरपर्यंत परतेल, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्याच्या दक्षिण मध्य भाग वगळता अन्य भागातूनही मान्सून परतेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणातून मान्सून येत्या १० ऑक्टोबरपर्यंत परतेल, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधून साधारण १७ सप्टेंबर दरम्यान सुरू होत असतो. यंदा आठवडाभर उशिरा परतीचा प्रवास सुरू झाला असून आत्तापर्यंत संपूर्ण राजस्थान, हरियाणा, पंजाब, तसेच जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश व गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छ भागातून परतला आहे. येत्या दोन-तीन दिवसात परतीचा हा प्रवास आणखीन वेगाने होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, 'मान्सूनच्या परतीची रेषा सध्या गुरुग्राम, धर्मशाला, इंदूर, बडोदा व पोरबंदर अशी तयार झाली आहे. पुढील दोन-तीन दिवसांत जम्मू काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेशचा काही भाग, सौराष्ट्र कच्छ तसेच महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्याची शक्यता आहे.

पुढील २४ तासांत पालघर, ठाणे, रायगड तसेच मध्य महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक विदर्भ व मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे दोन-तीन दिवसांत या भागातून मान्सून परतण्याची शक्यता आहे. मात्र, दक्षिण कोकणाच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर या जिल्ह्यांत पुढील तीन दिवसात आर्द्रता कमी होऊन पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे या भागातून पुढील पाच ते सहा दिवसात मान्सून परतेल. एकंदरीतच राज्यात दहा ते ११ ऑक्टोबरदरम्यान मान्सून संपूर्णपणे परतलेला असेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :मोसमी पाऊसपाऊसहवामानमहाराष्ट्रराजस्थान