उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण असताना, पूर्व विदर्भात मात्र मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे फळबागा, पशुधन आणि घरांचे नुकसान झाले. त्यामुळे राज्यात एकाचवेळी संमिश्र वातावरणाचा नागरिकांना अनुभव येत आहे.
मंगळवारीदेखील राज्यात अनेक शहरांत तापमान ४० अंशांच्या वर होते. अगदी विदर्भातही पारा ४४ अंशांपर्यंत होता. तिसऱ्या टप्प्याचे मतदान असलेल्या शहरातही दुपारच्या सुमारास तापमानामुळे मतदारांची गर्दी कमी झाली होती. असे असताना पूर्व विदर्भात गारपिटीची तडाखा बसला आहे.
नागपूर शहरात वादळामुळे झाडे उन्मळून पडली, विजेचे तार तुटले व टिनही उडाले. उत्तर व पूर्व नागपुरात गाराही पडल्या. भिवापूर तालुक्यात बैलजोडी व रामटेक तालुक्यात एक बैल वीज पडून ठार झाला.
सायंकाळच्या पावसाने दिवसभराच्या उकाड्यापासून काहीसा दिलासा नागरिकांना मिळाला. तसेच गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. एटापल्ली, तालुक्यातही पाऊस चामोर्शी झाला. वादळवाऱ्याने पिकांचेही नुकसान झाले. चंद्रपूर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसला.
पुढचे पाच दिवस अवकाळीचे सावटहवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे पाच दिवस ११ मेपर्यंत वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाचे सावट विदर्भासह मराठवाड्यात कायम राहणार आहे. मंगळवारी तापलेले अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाण्यासह नांदेड, लातूर व हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळीवारा, मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अधिक वाचा: दुष्काळातही ह्या चाऱ्यामुळे होतेय दुध उत्पादनात वाढ