Join us

रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही पडतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 4:25 PM

यंदा रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही जिल्ह्यात कुठे ना कुठे पडत आहे. बुधवारीही जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने उरले-सुरले खरीप व कांदा नुकसानीत भर पडली.

यंदा रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही जिल्ह्यात कुठे ना कुठे पडत आहे. बुधवारीही जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने उरले-सुरले खरीप व कांदा नुकसानीत भर पडली. मागील वर्षी पाऊस नसल्याने तर यंदा पाऊस थांबत नसल्याने खरीप पिके शेतकऱ्यांच्या हाती लागली नाही.

सोलापूर जिल्ह्यात यंदा चार नव्हे तर पाच महिन्यांचा पावसाळा झाला आहे. कारण जिल्ह्यात ५ जून रोजी सुरू झालेला पाऊस २४ ऑक्टोबरपर्यंत पडत आहे. पाच महिन्यांत मधल्या काळात अधून-मधून काही दिवसांची सुट्टी घेणारा पाऊस सतत पडतो आहे. 

एखादेही नक्षत्र असे नाही की पाऊस पडलाच नाही. सप्टेंबर महिन्यांपासून सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस दरवर्षीच पडतो मात्र मागील वर्षी पाऊस पडला नव्हता.

त्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांनाही फटका बसला होता. खरीप व रब्बी हंगामातील पिकांना तर फटका बसलाच शिवाय वार्षिक (केळी, ऊस, फळबागा व इतर) पिकांचेही पाण्याअभावी नुकसान झाले. यंदा सतत पाऊस पडत असल्याने पिके पाण्यात गेली आहेत.

ऑक्टोबर महिन्यात झाली ९२ टक्के वृष्टी■ ऑक्टोबर महिन्यात परतीचा सरासरी एकूण ९३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. कालपर्यंत जिल्हात ८५ मि. मी. म्हणजे ९२ टक्के पाऊस पडला आहे. रोहिणी नक्षत्रात सुरु झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही पडत आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा पाच महिन्यांचा ठरला आहे.■ ऑक्टोबर महिन्यात आजपर्यंत १३ दिवस पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दक्षिण तालुक्यात चार तर माढा तालुक्यात १२ दिवस पाऊस पडल्याचे कृषी खात्याकडील तक्त्यावरून दिसत आहे.■ जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरी ५५३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात ७०२ मि.मी. म्हणजे १२८ टक्क्यांपर्यंत पाऊस पडला आहे.

टॅग्स :हवामानपाऊसखरीपरब्बीशेतकरीशेतीपीक