Join us

पावसाची भेट सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात; हवामान विभागाचा अंदाज

By नितीन चौधरी | Published: August 26, 2023 11:40 AM

येत्या पंधरवड्यात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती नसल्याने सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडेल, तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

राज्यात पावसासाठी सध्या पोषक वातावरण असल्यामुळे ठरावीक जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील सात दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. येत्या पंधरवड्यात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती नसल्याने सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडेल, तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात सध्या तयार झालेल्या प्रणालीमुळे देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. मात्र, राज्यात केवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. याचा थेट परिणाम खरीप पिकांवर तसेच धरणातील पाणी साठ्यावर झाला आहे. याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, येत्या सात दिवसांमध्ये राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकणात बहुतेक आणि हलका तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. हा पाऊस सरासरीच्या किती तरी कमी असेल त्यानंतरच्या आठवड्यात देखील हीच स्थिती कायम राहील. मात्र, त्यात थोडी सुधारणा होऊ शकते. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात मान्सूनला अनुकूल प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सबंध राज्यभर सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडेल. परंतु सध्या राज्यात पावसाविना पिके सुकून चालली आहेत.

पुढील दोन आठवडे चांगल्या पावसाची शक्यता नाही. शेतकऱ्यांनी पिकांच्या संवेदनशील अवस्थेनुसार नियोजन करावे. कापूस पिकाला एक पाणी द्यावे, तर सोयाबीन पिकात एक सरी आड आंतरमशागत करून जमीन भुसशुशीत करावी. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता टिकून राहील.

राज्यात २५ ऑगस्टपर्यंत सरासरी ७६९.१ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात आतापर्यंत ६६२.३ मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या हा पाऊस ८६.१ टक्के इतका आहे.-डॉ. अनुपम काश्यपी, प्रमुख, हवामान अंदाज, भारतीय हवामानशास्त्र विभाग

एक जूनपासून २३ ऑगस्टपर्यंतचा पाऊसपालघर २४, ठाणे २६, मुंबई ३१, रायगड १४, सिंधुदुर्ग ३, कोल्हापूर १४, सांगली ४४, सातारा ३७, पुणे १६, सोलापूर २५, नगर ३३, नाशिक ७, धुळे २०, नंदुरबार २९, जळगाव ११, संभाजीनगर ३१, जालना ४६, बीड ३२, धाराशिव १९, परभणी २१, हिंगोली ३२, लातूर ४, नांदेड २७, बुलढाणा १९, अकोला २७, वाशिम १५, अमरावती ३१, यवतमाळ १० वर्धा ८, नागपूर ५, चंद्रपूर ४, भंडारा २, गोंदिया १५, गडचिरोली १. (सरासरीपेक्षा टक्क्यांत) 

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजपाऊसखरीपशेतकरी