सध्या पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीतही पैठण येथील नाथसागर जलाशयातील बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे दररोज धरणातून विविध शहरे व एमआयडीसाठी होत असलेल्या उपशापेक्षाही दुप्पट बाष्पीभवन होत आहे. यामुळे धरणातीलपाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.
जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र २१,७५० चौरस किलोमीटर आहे. धरण उथळ असल्याने पाण्याचे बाष्प लवकर होते. रोज साधारणपणे ०.४२५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. सध्या जायकवाडीत ४३.५ टक्के एवढा पाणीसाठा आहे. जायकवाडी येथील पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या मागे 'बाष्पीभवन मापक यंत्र' कार्यान्वित करण्यात आले आहे. दररोज होणाऱ्या बाष्पीभवनाची नोंद येथे होते.
उन्हाळा नसताना ०.५७१ दशलक्ष घनमीटर एवढ्या पाण्याचे बाष्पीभवन होते. मागील सात दिवसांपासून याचा वेग वाढला आहे. उन्हाळ्यात याचा वेग दोन पट अधिक असतो. धरणातून औद्योगिकसहघरगुती वापरासाठी ०.२९० दलघमी पाण्याचा उपसा होतो. मात्र याच्या दुपटीने दररोजचे बाष्पीभवन धरणाच्या पाण्याचे होताना दिसत आहे. थंडी वाढलेली असली तरीही दुपारच्या दरम्यान तापमानाचा पारा वाढत असल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे.
दररोज झालेले बाष्पीभवन
दि. २३ डिसेंबर ०.४६२ दलघमी
दि. २४- ०.४८० दलघमी
दि. २५ -०.४६१
दि. २६- ०.५५३
दि. २७- ०.५१६
दि. २८- ०.५५३
दि. २९- ०.५७१
जायकवाडीचा पाणीसाठा कुठवर?
धरणाचा पाणीसाठा ४३.५ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या आठवडाभरात बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. औद्योगिकसह घरगुती वापराला जेवढा दररोज पाणी उपसा केला जातो. त्याच्या दुप्पट दररोजचे बाष्पीभवन होत आहे. -विजय काकडे, जायकवाडी, धरण शाखा अभियंता