सोलापूर शहरासह भीमा नदी काठच्या गावांना पिण्याचा पाण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात ११ मार्चपासून पाणी सोडण्यात येणार आहे. २० मार्चपर्यंत हे पाणी टाकळी व चिंचपूर येथील बंधाऱ्यात वेळेत पोहोचण्यासाठी नदीकाठचा गावांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
नदीत पाणी चालू असेपर्यंत दररोज २ तास वीजपुरवठा सुरू राहणार आहे. या पाळीत चार-पाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून सोलापूरसह नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न पुढील दोन महिने मिटणार असल्याची माहिती जलसंपदा सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यातील पाणी पातळी कमी होत असल्यामळे २० मार्च अखेरच्या आत बंधारे भरून देण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती.
सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आदी शहरासाठी व भीमा नदीकाठावरील अनेक गावे, वाड्यावस्त्या व पशुधनासाठी पाण्याची टंचाई भास नये म्हणून भीमा नदी पात्रातून दोन पाळ्यात पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत यापूर्वीच घेण्यात आलेला होता. यानंतर मे महिन्यात सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीने ठरवलेले आहे.
यावर्षी ६०.६६ टक्के भरलेले उजनी वजा पाणी पातळीत गेले असून गतवर्षी ६ मार्च रोजी उजनी धरणात ६५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उजनी धरणाने तळ गाठल्याचे दिसत आहे. सध्या पाणी पातळी वजा १७.५७ खालावली आहे.