Join us

चोवीस तासात चार टीएमसी, उजनी धरणाची पाणी पातळी ७ टक्क्याने वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 11:59 AM

मागील २४ तासात उजनी धरणात सुमारे चार टीएमसी पाणी आले असून, टक्केवारी तब्बल ७ ने वाढली आहे, तर उपयुक्त साठाही २४.२५ टीएमसी एवढा झाला आहे.

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी व साठवण क्षमतेत राज्यात सर्वांत मोठे असलेले उजनी धरण सोमवारी सायंकाळी ४५ टक्के भरले असून, मंगळवारी पन्नाशी पार करेल. मागील २४ तासात उजनी धरणात सुमारे चार टीएमसी पाणी आले असून, टक्केवारी तब्बल ७ ने वाढली आहे, तर उपयुक्त साठाही २४.२५ टीएमसी एवढा झाला आहे. मात्र, सकाळी दौंड येथून ४० हजार क्युसेकने येणाऱ्या विसर्गामध्ये घट होऊन तो सायंकाळी २९,८५० क्युसेक झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे उजनीच्या वरील धरणातून सोडण्यात आलेला एकूण विसर्ग कमी करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी ६:०० वा. दौंड येथून येणारा विसर्ग वाढून ३४, १५८ क्यसेक झाला होता, तर रात्री ९:०० वा. त्यामध्ये वाढ होऊन तो ३८, १८३ क्युसेक झाला व रात्री १२:०० वाजता आणखी वाढून ३९,९८२ क्युसेक झाला होता. तो सोमवारी सायंकाळपर्यंत कायम होता. मात्र, दुपारी १२:०० वा. त्यामध्ये घट होऊन तो ३२,९८२ क्युसेक झाला, तर सायंकाळी त्यामध्ये घट होऊन विसर्ग २९,८५० क्युसेक झाला.

मागील २४ तासात दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये चढ-उतार झाला असला तरी एकूणच विसर्गामध्ये एकदम वाढ झाल्याने धरणात २४ तासात पाणी पातळी वाढून एकूण जलसाठा ८८ टीएमसी झाला आहे, तर टक्केवारी ७ने वाढून ४५.२६ झाली आहे. उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून, धरण वेगाने ५० टक्केकडे वाटचाल करीत आहे. दौडमधून येणारा विसर्ग असाच राहिल्यास मंगळवारी सायंकाळपर्यंत उजनी ५० टक्केच्या पुढे जाईल. ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंददायी गोष्ट आहे. सध्या जिल्ह्यातही सर्व दूर चांगला पाऊस पडत असल्याने शेतकरी बांधवांची शेतीच्या पाण्याची चिंता तर्तास मिटली आहे. तोपर्यंत उजनी धरणाची टक्केवारी अशीच वाढत राहिल्यास धरण ७० ते ८० टक्के भरण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.

चौदा धरणे शंभर टक्केउजनी धरणाच्या वरील बाजूस असलेली येडगाव, वडज, डिभे, घोड़, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंध्रा, पवना, कासारसाई, वरसगाव, पानशेत व खडकवासला ही १४ धरणे शंभर टक्के भरली आहेत, तर पिंपळजोगे, चिल्हेवाडी, मुळशी ही तीन धरणे ९० टक्क्यांच्या पुढे भरली आहेत. माणिकडोह ७९ टक्के, टेमघर ७९ टक्के व विसापूर ३३.३८ टक्के भरले आहे.

उजनीची सद्यस्थितीएकूण पाणीपातळी ४९४.०४५ मीटरएकूण जलसाठा ८८ टीएमसीउपयुक्त साठा २४.२५ टीएमसीटक्केवारी ४५.२६पाण्याचा विसर्गबंडगार्डन १३.८३० क्युसेकदौंड २९,८५० क्युसेक

उजनीचे पाणी औज बंधाऱ्यात पोहोचलेउजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी सोमवारी औज बंधायात पोहोचले. औज बंधाऱ्यात पाणी आल्याने भाविष्यात शहरात पाणीटंचाईचा प्रश्न उदभवणार नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. सध्या समाधानकारक पाऊस पडत असल्याने सोलापूरकरांवरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे.

टॅग्स :धरणपाऊससोलापूरशेतीपाणीशेतकरी