Join us

उजनीची पाणी पातळी खालावली; आता अवघे २० टक्के पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2023 10:10 AM

यंदा ६६ टक्के भरलेले उजनी धरण तीनच महिन्यांत २० टक्क्यांपर्यंत खालावले आहे. पावसाळ्याच्या अखेरीस संथ गतीने का होईना उजनी धरणात ६६ टक्क्यांपर्यंत पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अयोग्य नियोजनामुळे डिसेंबरअखेरीस २० टक्क्यांपर्यत पाणीपातळी खालावली.

यंदा ६६ टक्के भरलेले उजनी धरण तीनच महिन्यांत २० टक्क्यांपर्यंत खालावले आहे. पावसाळ्याच्या अखेरीस संथ गतीने का होईना उजनी धरणात ६६ टक्क्यांपर्यंत पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अयोग्य नियोजनामुळे डिसेंबरअखेरीस २० टक्क्यांपर्यत पाणीपातळी खालावल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

याच पद्धतीने पाण्याचा वापर झाला, तर लवकरच धरण मोकळे होणार आहे. परिणामी, येथील शेतीचे अस्तित्व धोक्यात येऊन पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागणार असल्याची भावना शेतकऱ्यांमधून होत आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असताना उजनीतील पाणीपातळी झपाट्याने घटत चालल्याने उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना उजनीच्या पाण्याचा ऐन उन्हाळ्यातील अनुभव जाणवू लागला आहे.

धरणातील पाणीसाठा अवघ्या २० टक्क्यांवरती आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणातील पाणीपातळी १०८ टक्के होती; परंतु सद्य:स्थितीत पाणीपातळी अल्प प्रमाणात आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली, तर आगामी काळात उजनी लाभक्षेत्रातील ऊस, केळीसह इतर फळबागांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी धास्तावला आहे. उजनी धरणासाठी येथील शेतकऱ्यांनी कसदार जमिनी दिल्या, वसलेली गावे प्रकल्पासाठी उठविण्यात आली; परंतु प्रकल्पग्रस्तांना विचारात न घेता उजनीच्या पाण्याचे नियोजन केले जात असल्याची तक्रारदेखील केली जात आहे.

धरणाची सद्यः स्थितीएकूण टक्केवारी- २०.७२कालवा- १,०००बोगदा- ८४०सीना माढा- ३१५दहीगाव- १२०बाष्पीभवन- ४.५८मागील वर्षी ६ मे २०२३ रोजी वजा झाले. २० डिसेंबर २०२२ एकूण टक्केवारी- १०८.८४. २६ जानेवारीपर्यंत वजा पातळीत प्रवेश होण्याची शक्यता.

उजनी धरण औज बंधारादरम्यानच्या शेतीला पाणी मिळावे, यासाठी सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम जाणीवपूर्वक रखडवले जात आहे, तेथील शेतकऱ्यांना पाणी देण्यास आमचा विरोध नाही; परंतु धरणात मुबलक पाणी असताना ही पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना दरवर्षी पिके जगवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करून पाण्याचे योग्य नियोजन करून उजनी ते औज बंधारादरम्यानच्या भीमा नदीकाठावरच्या शेतकऱ्यांना पाणी द्यावे. -किरण कवडे, माजी संचालक, आदिनाथ साखर कारखाना

आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघातील नागरिकांना खुश ठेवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी राजकीय दबाव टाकून उजनी धरणातून भरमसाठ पाणी सोडण्याचा घाट घातला आहे. परिणामी, करमाळा तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्रातील ३० गावांना याचा फटका बसत आहे. सध्या करमाळा येथील विद्यमान लोकप्रतिनिधी व प्रमुख नेते मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वतः लढण्यासाठी तयार राहावे. - डॉ. विजय रोकडे, चेअरमन, वांगी कार्यकारी सेवा सोसायटी

टॅग्स :उजनी धरणसोलापूरशेतकरीधरणपीकपाणीऊसकेळीसाखर कारखाने