गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने लातूर जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. परिणामी, सध्या व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे तर उर्वरित सहा प्रकल्पांमध्ये केवळ २१.८४ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच पाणीटंचाईच्या झळा जाणवण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
गत पावसाळ्यात उशिराने पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांनाही विलंब झाला. दरम्यान, पिकांपुरता पाऊस झाल्याने खरिपातील पिके चांगली उगवली होती; परंतु ऑगस्टमध्ये जवळपास महिन्यापेक्षा अधिक दिवस पावसाने ताण दिला. परिणामी, खरीप पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. शिवाय, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह ओढे-नाले वाहिले नाहीत. त्याचबरोबर विहिर, कूपनलिकांमध्ये पाण्याचा संचय झाला नाही.
मध्यम प्रकल्पातील पाणी आरक्षित
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. प्रकल्पातील पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी करु नये म्हणून सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच तालुका प्रशासन व महावितरणने प्रकल्पावर लक्ष देऊन विद्युत मोटारीद्वारे पाण्याचा शेतीसाठी वापर होत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.
तलावांमध्ये २२.९९ टक्के साठा
लघु पाटबंधारे विभागांतर्गत एकूण १३४ तलाव आहेत. या तलावात प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा ७२.२४६ दलघमी असून त्याची टक्केवारी २२.९९ टक्के अशी आहे. दरम्यान, दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून प्रकल्पातील पाण्याचा वापर शेतीसाठी करण्यात येऊ नये, अशा सूचना करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात दरवर्षी परतीचा पाऊस होतो. त्यामुळे यंदाही परतीचा पाऊस होईल, अशी शेतकऱ्यांसह प्रशासनाला अपेक्षा होती, परंतु परतीच्या पावसाने पाठ फिरविली, त्यामुळे आशेवर पाणी फिरले. परिणामी, पाणीटंचाईची भीती वाढू लागली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला.
जलसाठा घटू लागल्याने चिंता...
दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला चिंता लागली आहे.सध्या तावरजा मध्यम प्रकल्पात ०.०६२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच रेणापूर प्रकल्पात ४.०३८, देवर्जन-३.४६९, साकोळ ४.९२०, घरणी - ७.०१७, मसलगा- ७.१७० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. सध्या एकूण २६.६७६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.