जायकवाडी धरणातीलपाणीसाठा कमी झाल्याने धरणाच्या डाव्या कालव्यावर पाणी न सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीटंचाई पुढे येण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणीसाठ्याची पातळी खालावली आहे. डाव्या कालव्यावर उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने आणि उन्हाळ्यात पाणी मिळणार नसल्याने यावर्षी उसाचे चिपाड होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असल्याची स्थिती आहे.
जायकवाडी धरणामध्ये यावर्षी आवश्यक पाणीसाठा न झाल्याने सुरुवातीपासूनच या भागात सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले होते. जायकवाडी धरणात वरील धरणातून पाणी सोडण्यात आले असले तरी सद्य:स्थितीत मुबलक पाणीसाठा नसल्याने जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडले जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर या भागातील अर्ध्या-अधिक सिंचन क्षेत्र अवलंबून असते. शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. मात्र, यावर्षी उन्हाळी हंगामातील पिकांना जायकवाडीतून पाणीच मिळणार नसल्याने त्या भागातील उसाला चांगला फटका बसणार आहे. तालुक्यामध्ये दोन खासगी साखर कारखाने असून जवळपास दहा हजार हेक्टर उसाची गतवर्षी लागवड झाली होती. यावर्षी पाण्याअभावी ऊस पट्ट्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. तर शिल्लक क्षेत्रावरील ऊस जोपासण्यासाठी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांमध्ये कसरत करावी लागणार आहे.
ढालेगाव बंधाऱ्यात ११.५ टक्के पाणी
■ गोदावरी पात्रातील बंधाऱ्यातील पाणीपातळी खालावलेली असून बंधाऱ्यातील पाणी जोत्याखाली आहे. ढालेगाव बंधारा तर चक्च साडेअकरा टक्क्यांवर आला आहे.
■ जिवंत पाणीसाठा १.५६ दलघमी इतका आहे. यामुळे पुढील एक महिन्यांमध्ये बंधाऱ्यातील पाणीसाठा अत्यंत कमी होईल, ढालेगाव बंधाऱ्यावर पाथरी शहराची पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याने त्याचा फटका पाथरी शहराला असणार आहे.
आवर्तनालाही आठ दिवस लागणार
■ जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यामध्ये रब्बी हंगामासाठी दोन आवर्तन मंजूर करण्यात आले होते. पहिले आवर्तन नंबर महिन्यामध्ये सोडण्यात आले तर आता दुसया आवर्तन २६ जानेवारीपासून सोडण्यात आले आहे.
■ सध्या परभणी भागात पाणी सोडण्यात आले असून, पाथरी उपविभागात शेतकऱ्यांना दुसरे आवर्तन मिळण्यासाठी किमान आठ दिवस लागणार आहेत.