Join us

उजनी धरणात पाणीसाठा वाढला, शेतीसाठी पाणी सोडावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 10:22 AM

सध्या धरण ५७.३१ टक्क्यांवर पोहोचले आहे. धरणातील एकूण जलसाठा ९५ टीएमसी झाला असून धरण १०० टक्के भरण्यासाठी २३ टीएमसी पाण्याची गरज आहे.

राज्यात सर्वात जास्त साठवण क्षमता असलेले व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीचा कणा असलेल्या उजनी धरणाची कासव गतीने साठीकडे वाटचाल सुरू आहे. सध्या धरण ५७.३१ टक्क्यांवर पोहोचले आहे. धरणातील एकूण जलसाठा ९५ टीएमसी झाला असून धरण १०० टक्के भरण्यासाठी २३ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यामुळे चालू वर्षी उजनी शंभर टक्के भरणार का याची चर्चा जिल्ह्यातील शेतकरी बांधव करीत आहेत.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाने मागील तीन-चार दिवसांपासून पूर्णपणे विश्रांती घेतल्याने वरील धरणातून येणाऱ्या विसर्ग मध्येही मोठी घट झाली आहे. सध्या वरील घोड धरणातून २४०० क्युसेक, चिल्लेवाडी ५० क्युसेक, कळमोडी ६४ क्युसेक तर आंध्रामधून २११ क्युसेक असा केवळ २७२५ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे बंडगार्डन व दौंड येथून येणाऱ्या विसर्गामध्येही घट झालेली आहे.

गुरुवारी सायंकाळी दौंड येथून ९३१८ क्युसेकने विसर्ग उजनीच्या दिशेने येत होता. त्यामध्ये शुक्रवारी सकाळी घट होऊन तो ७३३१ क्युसेक झाला तर सायंकाळी त्यामध्ये आणखी घट होऊन तो सध्या ६४८५ क्युसेकने चालू आहे. मागील २४ तासात उजनीची टक्केवारी फक्त पावणेदोन टक्क्याने वाढली आहे. वर ०.१२ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. धरणाच्या यशवंतसागर जलाशयातील एकूण जलसाठा ९५ टीएमसी झाला आहे तर उपयुक्त साठा ३१ टीएमसी एवढा झाला आहे. त्यामुळे यंदा उजनी धरण शंभर टक्के भरणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मात्र कासवगतीने का होईना भरत असल्याने समाधानही व्यक्त होत आहे.

शेतीसाठी एक आवर्तन सोडावे लागणारमागील पंधरवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने आता तरी लगेच शेतीसाठी पाणी सोडण्याची गरज नसली तरी सध्याची ऑक्टोबर हिट पाहता लवकरच उभ्या पिकांना पाणी देण्याची गरज भासणार आहे. त्यासाठी उजनी धरणातून शेतीसाठी एक आवर्तन सोडावे लागणार आहे. परंतु धरणातील उपलब्ध जलसाठा व संपत आलेला पावसाळा याचा विचार करूनच शासन व प्रशासनास पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

धरणाची सद्यस्थिती - एकूण पाणी पातळी ४९४.७२० मीटर- एकूण जलसाठा ९४.३६ टीएमसी- उपयुक्त साठा ३०.७० टीएमसी- टक्केवारी ५७.३१इनफ्लो- बंडगार्डन २१८७ क्युसेक- दौंड ६४५८ क्युसेक

टॅग्स :धरणसोलापूरशेतीशेतकरीऊस