Join us

पुढील पाच दिवस मरावाड्यात हवामान कोरडे, शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 8:15 PM

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला हवामान कृषीसल्ला..

राज्यभरात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान पुढील पाच दिवस मराठवाड्यात कमाल तापमानात १ ते २ अंशांची वाढ होणार असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवले आहे.

विस्तारित अंदाजानुसार, मराठवाडयात दिनांक 26 जानेवारी ते 02 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 03 ते 09 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक 28 जानेवारी ते 03 फेब्रुवारी 2024 दरम्यान मराठवाड्यात कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

बाष्पोत्सर्जनाचा वाढला वेग

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

हरभऱ्याची अशी घ्या काळजी

  • मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. 
  • पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. मागील दोन दिवसातील ढगाळ वातावरणामूळे, हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत.
  • हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

हळद आणि करडईसाठी हे करा 

करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड करावी. हंगामी ऊसाची लागवड 15 फेब्रूवारी पर्यंत करता येते.

हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे. उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी एकेटी-101, एकेटी-103, जेएलटी-408, एकेटी-64, एनटी-11-91 या वाणांपैकी वाणाची निवड करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या दूसऱ्या आठवड्या पर्यंत करता येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृगबहार धरलेल्या संत्रा/मोसंबी फळबागेत फळाचा आकार वाढण्यासाठी 00:52:34 1.5 ग्रॅम  प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. 

तोडणीस तयार असलेल्या मृग बहार डाळींब फळांची तोडणी करावी. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी. मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, फुल पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

टॅग्स :हवामानपीक व्यवस्थापनशेतकरी