Join us

Krishna River राज्यात सगळीकडे दुष्काळ तर, कृष्णाकाठी पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:30 AM

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याने कृष्णा नदी काठावर पाणीच पाणी पाहायला मिळत असल्याने जनतेतून आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे.

बोरगाव : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याने कृष्णा नदी काठावर पाणीचपाणी पाहायला मिळत असल्याने जनतेतून आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे याच पाण्याचा गैरवापर करून पाण्याची नासाडीही केली जात आहे.

सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ तालुक्यात व राज्याच्या अनेक भागांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. उन्हाच्या दाहकतेने नद्या, विहिरी, ओढे, कालवे ही कोरडे ठणठणीत पडले आहेत. जनतेला पिण्याच्या एक घागरभर पाण्यासाठी वणवण व भटकंती करावी लागत आहे.

माणसाबरोबर जनावरांच्याही चाऱ्याचा व पाण्याचा गंभीर प्रश्न रूप धारण करत आहे. काही भागांतील शेतातील उभी पिके पाण्याविना करपू लागली आहेत अशी भीषण परिस्थितीत उ‌द्भवली असताना कृष्णा नदी काठावरीला नागरिकांना मात्र पाणीच पाणी उपलब्ध होत असल्याने पाण्याची कोणत्याच प्रकारची झळ बसताना दिसत नाही.

ही बाब नदी काठावरील नागरिकांसाठी भाग्यशाली ठरत आहे कृष्णा दुथडी वाहत असल्याने कृष्णा नदी काठावरील बोरगाव, रेठरेहरणाक्ष ताकारी, बहे, तांबवे नरसिंहपूर, वाळवा भिलवडीपर्यंतच्या भागांत पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. पाण्याचा जपून वापर करावा अशी मागणी सजगा नागरिकांमधून मात्र होत आहे.

कृष्णाकाठावरील मुबलक पाण्यामुळे नदी काठावरील जनता स्वतःला भाग्यशाली समजत आहे. अशी परिस्थिती असताना काही ठिकाणी पाण्याचा विनियोग व पाण्याची नासाडी चालल्याचे चित्र ही कृष्णाकाठावर पाहायला मिळत आहे. नागरिकांनी पाणीटंचाई भागाची परिस्थिती डोळ्यासमोर आणावी व पाण्याचा गैरवापर व नासाडी थांबवावी. - भागवत जाधव, अध्यक्ष, वाळवा तालुका शेतकरी संघटना

टॅग्स :नदीसांगलीसातारादुष्काळपाणीपाणी टंचाईपाणीकपात