गणेश पोळटेंभुर्णी : भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात मोठी घट झाली आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. उजनीतून ४१ हजार ६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
तसेच उजनीवरील वीज निर्मिती प्रकल्पाला सोडलेल्या पाण्यातून तीन दिवसांत आठ लाख ६४ हजार युनिट वीज निर्मिती झाली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे दौंड विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता.
सध्या दौंड येथून २० हजार ८०० क्युसेक विसर्ग सुरू असून, उजनीतून भीमा नदीत ४१ हजार ६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. पावसाळा आणखी दोन महिने शिल्लक असल्याने उजनी धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून दौंड विसर्गात कुठलाही खंड पडला नाही. दि. ७ जूनपासून दौंड येथून उजनी धरणातपाणी येण्यास सुरुवात झाली होती. यामुळे उजनी दोन महिन्यांत मृत साठ्यासह १७० टक्के भरू शकले.
यावर्षी उजनी वजा ६० टक्केपर्यंत खाली गेले होते. वजा ६० टक्के व उपयुक्त पाणी पातळी ११० टक्के असे एकूण १७० टक्के पाणी पातळी गेल्या दोन महिन्यांत वाढली. उजनी धरणात केवळ ३२.५३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. सध्या १२० टीएमसी पाणी उजनी धरणात आहे. ५६.६९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
२६ जुलैला उजनी मृत साठ्यातून बाहेर आल्यानंतर दहा दिवसांत शंभर टक्के भरले होते. सध्या उजनी धरणातून वीज निर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत असून, यापासून १२ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात येतो.
एका तासाला १२ हजार युनिटी वीज निर्मितीएका तासात १२ हजार, तर २४ तासांत २ लाख ८८ हजार युनिट वीज निर्मिती करण्यात येते. २०२२ मध्ये देखभाल दुरुस्तीमुळे जास्त दिवस कार्यान्वित नव्हता, तर गतवर्षी २०२३ मध्ये उजनी पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला नव्हता. यावर्षी जास्त दिवस चालणार आहे. जोपर्यंत उजनी धरणातून भीमा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे तोपर्यंत वीज निर्मिती प्रकल्प चालू राहणार आहे.