दोन दिवसांच्या छोट्याशा विश्रांतीनंतर बुधवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सुदैवाने कोठेही पूरस्थिती निर्माण झाली नव्हती; परंतु आंबोली येथे घाटात मोठा दगड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
आतापर्यंत १८ धरणे १०० टक्के भरली आहेत, तर तिलारी, कोर्ले सातंडी, देवधर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, या तिन्ही प्रकल्पांतून १४,२७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत ४७.२ च्या सरासरीने पाऊस झाला आहे.
१५ ते १७ जुलै कालावधीत ऑरेंज अलर्ट दिला होता. पहिले २ दिवस जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. १७ जुलै रोजी सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे. सुदैवाने पूरस्थिती निर्माण झाली नव्हती.
आंबोली येथे सकाळी मोठा दगड कोसळून रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. छोटी वाहन बाजूने जात होती. घटनास्थळी पोलिस हवालदार दत्ता देसाई, दादा शिंदे, पोलिस हवालदार प्रवीण सापळे, महेंद्र बांधकर यांनी पोहोचून मदतकार्य करत जेसीबीच्या साहाय्याने दगड बाजूला करण्यात आला.
त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आज झालेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तिलारी, तेरेखोल, कल्लीं, गड, वाघोटन या प्रमुख नद्या आहेत. या नद्यांनी इशारापातळी जरी ओलांडली तरी ग्रामीण भागात पुरसादृश स्थिती निर्माण होते.
आज सुरू असलेल्या पावसामुळे सर्व नद्या इशारा पातळीच्या खालून वाहत आहेत. त्यामुळे कोणताही प्रकारचा धोका उद्भवण्याची शक्यता फार कमी आहे. चालू पावसाळी हंगामात घरांची पडझड, गोठे, नांगर, दुकाने यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
शेती पाण्याखाली जाऊन तिचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा हा पाच कोटींच्या आहे. बाहेर गेला आहे. मात्र, जे लोक बाधित झाले आहेत, त्यांना जिल्हा प्रशासनाकडून मदत देण्यात आलेली मात्र नुकसानग्रस्त भरीव मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत झालेला पाऊसदेवगड ६०.४ मिमी, मालवण ३८.८ मिमी, सावंतवाडी ५५.३ मिमी, वेंगुर्ला ३८.८ मिमी, कणकवली ४७.७ मिमी, कुडाळ ४२.२ मिमी, वैभववाडी ४८ मिमी, दोडामार्ग ५४ मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.
धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्गतिलारी, कोर्ले सातंडी, देवधर हे मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, त्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. अनुक्रमे ४ हजार १०७, ९ हजार ४४३, ७२८, असा मिळून १४,२७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर १८ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून यामध्ये शिवडाव, तरंदळे, आडेली, आंबोली, हातेरी, मांडखोल, सनमतेंब, हरकुल, ओझरम, निळेली, पुळास, वाफोली, लोरे, शिरवल, धामापूर, वर्दे, ओसरगाव यांचा समावेश आहे.