डेहणे : खेड तालुक्यातील पश्चिम व पूर्व पट्टयाला वरदान ठरलेले कळमोडी धरण १०० टक्के भरले आहे. कळमोडी धरणातील सांडव्यावरून पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग आरळा नदी पात्रात होत असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.
सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील सर्वप्रथम शंभर टक्के भरलेले कळमोडी धरण आहे. हा प्रकल्प भरून वाहू लागल्याने पश्चिम भागातील नागरिकांकडून तसेच शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कळमोडी धरण रविवारी (दि.२१) पहाटे पूर्ण क्षमतेने भरताच पहाटे साडेपाचच्या दरम्यान धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. धरणात चार वर्षांपासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली होती. या धरणाला दरवाजे नसल्याने पाण्याचा विसर्ग सांडव्यामार्गे होतो. धरण भरताच सांडव्यावरून वेगाने पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे.
कळमोडी धरण परिसरात उशिरा का होईना पावसाचा समाधानकारक जोर असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊन धरण १०९ टक्के भरले. धरणाची ४२.८७ दलघमी म्हणजेच १.५१ टीएमसी पाणीसाठा क्षमता आहे.
कळमोडी धरण भरल्यानंतर चास कमान धरणाच्या जलसाठा वाढण्यास मदत होते. १ जूनपासून ४६६ मिमी. पावसाची नोंद झाली असून गतवर्षी १७ जुलैला भरलेल्या धरणाला चालूवर्षी २१ जुलै हा दिवस उजाडला आहे. कळमोडी धरण भरल्याने या धरणातून बाहेर पडणारे पाणी चास कमान धरणात येत आहे.
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- प्रत्यक्षात धरणाची साठवण क्षमता जरी १.५१ टीएमसी आली तरी अंतर्गत राडारोडा असल्याने पाणी साठवण पूर्ण क्षमतेने होत नाही. आत मध्ये असणारा राडारोडा काढण्याची मागणी गेली अनेक वर्षांपासून सातत्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्गात केले जात आहे.
- सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतातुर झाले होते परंतु धरण भरल्याने शेतकरी वर्ग आनंदी असल्याचे पाहावयास मिळाले. प्रशासनाच्या वतीने नदी खालील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीपात्रातील शेतीविषयक औजारे वा तत्सम साहित्य अथवा जनावरे यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.