Lokmat Agro >हवामान > मराठवाड्यात पावसाचा असा आहे अंदाज, असे करा पीक व्यवस्थापन

मराठवाड्यात पावसाचा असा आहे अंदाज, असे करा पीक व्यवस्थापन

This is the forecast of rain in Marathwada, do crop management like this | मराठवाड्यात पावसाचा असा आहे अंदाज, असे करा पीक व्यवस्थापन

मराठवाड्यात पावसाचा असा आहे अंदाज, असे करा पीक व्यवस्थापन

हवामानानुसार मराठवाड्यासाठी १८ ऑगस्ट २३ पर्यंतचा पीक व्यवस्थापन व जनावर व्यवस्थापनाचा सल्ला.

हवामानानुसार मराठवाड्यासाठी १८ ऑगस्ट २३ पर्यंतचा पीक व्यवस्थापन व जनावर व्यवस्थापनाचा सल्ला.

शेअर :

Join us
Join usNext

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक १६ व १८ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक १८ ते २४ ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक १६ ते २२ ऑगस्ट २३ दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे.

दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन
कापूस, तुर, मुग/उडीद, भुईमूग व मका पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. कापूस व तूर  पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. मागील काहि दिवसापासून पावसाने दिलेली उघाड यामूळे कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव वाढला आहे याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रीड 20% 40 ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. 

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. सध्या पावसाने उघडीप दिल्यामूळे कापूस, तुर, मुग/उडीद, भुईमूग  पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर फवारणी करावी. 

मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  80 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 80 मिली प्रति एकर वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन
नविन लागवड केलेल्या केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत हलकी कोळपणी करावी जेणेकरून बागेतील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. केळी बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

भाजीपाला
भाजीपाला पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. सध्या पावसाने उघडीप दिल्यामूळे भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी.

फुलशेती
नवीन लागवड केलेल्या फुल पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. फुल पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन
गोवंशीय पशुधनामध्ये सध्या लम्पी स्कीन डीसीज होत आहे. यांचा प्रसार अनेक मार्गापैकी एक म्हणजे किटकवर्गीय चावणाऱ्या माशांमार्फत होतो. त्या किटकवर्गीय माशा व त्यांचे नियंत्रण : किटकवर्गीय माशा : यामध्ये सर्वात जास्त हिमॅटोबीया प्रजातीची माशी, त्यानंतर टॅबॅनस, स्टोमोक्षीस, क्यूलिफॉईडस आणि डास, या सर्व प्रजातीच्या माशा रक्त शोषण करतात व लम्पी स्कीन डिसीजचे विषाणू यांत्रीक पध्दतीने प्रसारीत करतात. हिमॅटोबीया ही माशी पशुधनास अठ्ठेचाळीस वेळेस चावे व टाकलेल्या ताज्या शेणावरती अंडी घालते. अ) शेणाची योग्य विल्हेवाट लावणे व शेणाचा  खड्डा पॉलीथीन/ताडपत्रीने आच्छादित करणे. ब) पशुधनाच्या शरीरावर वनस्पतीजन्य अथवा रासायनिक किटकनाशकाच्या द्रावणाची फवारणी करणे. टॅबॅनस ही माशी आकाराने मोठी असून गाय/म्हैस यांना प्रखर सुर्यप्रकाशामध्ये चावा घेते व त्याजागी रक्त वाहते. अ) पशुधनास प्रखर सुर्यप्रकाशामध्ये (सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत) चरावयास सोडू नये व गोठयात ठेवावे. स्टोमोक्सीस या प्रजातीच्या माशा मुत्राने माखलेल्या वैरणीवरती आपली अंडी घालतात. अ) गोठयातील अर्वरीत वैरण शेणाच्या खड्डयामध्ये टाकावी. ब) या माशा देखील प्रखर सुर्यप्रकाश असताना चावतात म्हणून प्रखर सुर्यप्रकाशाच्या वेळा सोडून पशुधनास चरावयास सोडावे.

सामुदायिक विज्ञान
भेंडी व वांगी तोडणी जरी सोपी वाटत असली तरी हे काम अतिशय कठीण आहे. भेंडीवर असणारी बारीक लव हातांना खाज आणते. भेंडी तोडल्यानंतर देठामधून निघणारा चिकट द्रव यामुळे भेंडी बोटामधून निसटते व भेंडी तोडणे अवघड होते. भेंडी आणि बोटांचे सतत घर्षण झाल्यामूळे बोटे रक्ताळतात आणि बोटांची आग होते, तर वांगी तोडतांना बोटांमध्ये काटे घुसतात. यावर उपाय म्हणून शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी जनाई मोजाचा वापर करावा.

(सौजन्‍य: मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
 

Web Title: This is the forecast of rain in Marathwada, do crop management like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.