Join us

राज्यात यंदा उन्हाळा कडक! विविध भागात येणार उष्णतेची लाट, काय सांगितलं हवामान खात्यानं?

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 02, 2024 11:29 AM

उष्णतेच्या लाटा वाढणार, महाराष्ट्र तीव्र उन्हाच्या चटक्यात होरपण्याचा अंदाज...

Maharashtra Hot Summer: राज्यात यंदाचा उन्हाळा कडक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बहुतांश राज्यांमध्ये उन्हाच्या तीव्र झळांना नागरिकांना सामोरे जावे लागणार असून राज्यात विविध भागात उष्णतेची लाट येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कमाल व किमान तापमान चढेच राहणार असल्याचे हवामान विभागाने नुकत्याच समोर आलेल्या अहवालात सांगितले. भारतीय हवामान विभाग व केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे प्रत्येक ऋतूच्या सुरुवातीला हवामान अंदाज वर्तवण्यात येतो. यानुसार हा अंदाज शुक्रवारी वर्तवण्यात आला.

या अहवालानुसार, देशातील बहुतांश भागात कमाल व किमान तापमान सामान्य तापमानाहून अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच राज्यात विविध भागात यावर्षी उष्णतेची लाट येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्र उन्हाच्या तीव्र चटक्याने होरपळण्याची शक्यता आहे.

सध्या प्रशांत महासागरात उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या एल निनोच्या प्रभाव लक्षात घेण्यासाठी माहिती संकलित करण्यात आली. यानुसार विषुवृत्तावरील प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे.

मार्च ते मे महिन्यात उष्णतेची लाटा 

महाराष्ट्रात मार्च  ते मे महिन्यात तापमान चढे राहणार असून विविध भागात उष्णतेची लाट संभावते.  राज्यात यंदाचा उन्हाळा कडक झळांचा राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मार्चमध्ये  पाऊस वाढणार

यंदा मार्च महिन्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १९७१ ते २०२० दरम्यान झालेल्या पावसाच्या आधारे मार्चमध्ये साधारण २९.९ मिमी पाऊस पडतो. यंदा तो त्याहून अधिक होणार आहे.