बोदवड : पूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर आता झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. धोनखेडा व कुन्हा शिवारात पडलेल्या ढगफुटीसदृश पावसाने काही शेतांचे बांध फुटले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
धोनखेड येथील शेतकरी संजय पाटील, दशरथ पाटील, जवान जुलालसिंग पाटील, ज्ञानेश्वर दिवानसिंग पाटील यांच्या शेतांचे बांध फुटले तर काहींच्या शेतात तळे साचले आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी विभागास माहिती दिली असून पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
तालुक्यात ४ जुलै रोजी संध्याकाळी व ६ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने धनखेड, कुन्हा हरदो, शेवगा शिवारात चक्क ढगफुटीसदृश पाऊस झाला असून नदी व नाले भरून वाहू लागले. यामुळे शिवारातील काही शेतांचे बांध फुटले, तर काही शेतात तळे साचले आहे, तर काहींची बीजवाई वाहून गेली.
दोन दिवसांत असा झाला पाऊस तालुक्यात ४ रोजी सर्वाधिक पाऊस बोदवड परिमंडळात ३५ मिमी, तर नाडगाव ८, करंजी २० असा एकूण सरासरी पाऊस झाला. ५ जुलै रोजी बोदवड परिमंडळात १८, नाडगाव १०, करंजी 3 असा पाऊस झाला. बोदवड परिमंडळातील धोंनखेड शिवारात अति पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून अनेकांनी शेतात पेरणी करून ठेवलेली होती.