राज्यात मागील १० दिवसांपासून तापमानाचा पारा ४० पार जात असून उष्ण झळांनी नागरिक मेटाकूटीला आहे आहेत. मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पुढील दोन महिने उष्णतेच्या लाटा येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
दरम्यान, हवामान विभागाच्या दैनंदिन हवामान अहवालात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान राहणार याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानुसार आज सुमारे १३ जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीसपार जाणार असल्याचे समोर येत आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये तापमान ४० पार?
अहमदनगर- ४०.१
अकोला- ४३.८
छत्रपती संभाजीनगर- ४१.६
बुलढाणा- ४१.२
धुळे- ४२.७
जळगाव-४३.७
लातूर-४०.६
नागपूर- ४३.२ ते ४६.६
नाशिक- ४१.१
धाराशिव- ४२
पुणे- ४०.८
रायगड-४१.३
सोलापूर-४२.६
वर्धा- ४२.२
उर्वरित जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी तापमान चाळीसच्या दिशेने जाणारे आहे. ३५ ते ३९ च्या दरम्यान हे तापमान असून येणाऱ्या काळात राज्यात उष्णतेच्या लाटांचा अंदाज देण्यात येत आहे. विदर्भात नागपूर मध्ये आज सर्वाधिक ४६.६ अंश कमाल तापमानाची संभावना असून अकोला, जळगाव, वर्धा, धुळे जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून तापमान चाळीसच्या वरच असल्याचे दिसून आले.
मराठवाड्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्ह्यात तापमानाचा पारा मागील आठवड्यापासून चढा असून दिवसभर उष्णतेने नागरिकांच्या जीवाची काहिली होत आहे. हवामान विभागाने मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवल्यानंतर काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली पण कमाल तापमानाचा पारा चाळीसच्या वरच राहिल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले.