Join us

Today's Maharashtra Rain : राज्यात आज कुठे बरसणार पाऊस? 'या' ४ जिल्ह्यांत हवामान विभागाचा रेड अलर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 8:12 AM

Maharashtra Weather : राज्यभरामध्ये आज चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Latest Rain Updates : राज्यभर मान्सूनचा पाऊस बरसत असून शेतकऱ्यांची खरिपातील शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पेरण्या आणि लागवडी आवरल्या असून शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्जही भरले आहेत. तर मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाडा आणि विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात चांगला पाऊस बरसत आहे. 

हवामान विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर रायगड, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांतही अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून  येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

त्याचबरोबर आज नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांत कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. कोकणातील पालघर जिल्ह्यांत मात्र येलो अलर्ट देण्यात आला असून संपूर्ण पश्चिम किनारपट्टीचा विचार केला तर या जिल्ह्यांत आज कमी पावसाची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव, सांगली आणि सोलापूर हे चार जिल्हे, मराठावाडा विभागातील सर्व जिल्हे आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यातील अकोला, अमरावती आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

ज्या चार जिल्ह्यांत रेड अलर्ट दिला आहे त्या सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी आपली काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यामध्ये दरडी कोसळणे, नद्या-नाल्यांना पूर येणे असा घटना घडत असतात, त्यामुळे पाण्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. धोकादायक ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार पिकांची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल.

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसमहाराष्ट्रशेतकरीपीक