Join us

Ujani Dam: उजनी धरणात मागील महिन्यात आलं इतकं पाणी; जाणून घ्या आजची पाणीपातळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 3:29 PM

उजनी धरणात दौंड येथून येणारा विसर्ग स्थिर असून, गुरुवारी (दि.११) सायंकाळी ६ वाजता ४ हजार २२० क्युसेक चालू होता. सकाळी ६ वाजता ४ हजार ९५६ क्युसेक होता.

टेंभुर्णी : उजनी धरणात दौंड येथून येणारा विसर्ग स्थिर असून, गुरुवारी (दि.११) सायंकाळी ६ वाजता ४ हजार २२० क्युसेक चालू होता. सकाळी ६ वाजता ४ हजार ९५६ क्युसेक होता. पुणे जिल्ह्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने उजनी धरणात येणाऱ्या दौंड विसर्गात घट होत गेली आहे.

सध्या उजनी धरणाचीपाणी पातळी वजा ३५.०८ असून, एकूण ४४.८७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ६३.६६ टीएमसी हा राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यातील धरण म्हणून उजनी धरणाची ओळख आहे. उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर येण्यासाठी आणखी १८.७९ टीएमसी पाणीसाठा वाढणे अपेक्षित आहे. गतवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे.

यावर्षी पाऊस लवकर सुरू झाला असला तरी दौंड विसर्ग १० हजारांच्या पुढे गेला नसल्याने उजनी लाभ क्षेत्रातील आडसाली ऊस लागवडी खोळंबल्या आहेत. गतवर्षी ९ जुलै २३ रोजी उजनी वजा ३६.१९ टक्के पर्यंत पाणी पातळी गेली होती.

यावर्षी उजनी केवळ ६०.६६ टक्के भरल्याने यावर्षी वजा ५९.९९ टक्के पर्यंत पाणीपातळी खालावली होती, तर गतवर्षी ११ जुलै २३ रोजी वजा ३५.५१ टक्के पाणी पातळी होता. यावर्षीदेखील तितकाच ३५.०८ टक्के पाणी पातळी आहे, तर गतवर्षी २० दिवसांत १ ऑगस्ट २३ रोजी उजनी मृत साठ्यातून बाहेर आले होते. यावेळी उजनी कधी मृत साठ्यातून बाहेर येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यातील ६३.६६ टीएमसी क्षमता असलेल्या उजनी धरणात गेल्या ३४ दिवसांत १३.३५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. दि. ७ जून रोजी ३१.५२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. 

टॅग्स :उजनी धरणपाणीसोलापूरशेतकरीशेतीदौंडऊसधरण