टेंभुर्णी: पुणे जिल्ह्यात रविवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवार सायंकाळनंतर दौंड विसर्गात वाढ होणार आहे. सध्या उजनी धरणाचीपाणी पातळी संथ गतीने वाढत आहे.
दि. २३ रोजी सायंकाळी ६ वाजता ४४. ५६ टक्के झाली होती. पुणे शहरात व पिंपरी चिंचवड तसेच भीमा खोऱ्यातील परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या शहरातील विसर्ग इंद्रायणी नदीद्वारे थेट भीमा नदीला मिसळणार आहे. त्यामुळे दौड दि. २४ साधिकाळयात वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या दौंड येथून २ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू असून ९ जूनपासून कमी अधिक प्रमाणात सातत्याने सुरू आहे. त्यामुळे संथ गतीने का होईना उजनी धरणाचीपाणी पातळी वाढत चालली आहे. गेल्या पंधरा दिवसांत १५. ४३ टक्के पाणी पातळी वाढली आहे तर ८.२७ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
सध्या उजनी धरणात ३९.७९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दररोज अर्धा टक्के उजनी धरणाची वाढ होत आहे. जून महिन्यात १५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. उजनी मृत साठ्यातून कधी येणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
करमाळा तालुक्यात जून महिन्यात पंधरा दिवसांतच सरासरी २७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सतत दररोज पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे करमाळा शहर व परिसरातील नाले, ओढे तुडूंब भरून वाहू लागले आहेत.
सीना नदीला पाणी वाहायला लागले असून, तालुक्यातून वाहणाऱ्या भिमा नदीला पाणी आले असून, उजनी धरणात पाणी वाढले आहे. दमदार पावसामुळे जमिनी खालील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आटलेल्या बोअरवेलमध्ये पुन्हा पाणी येऊ लागले आहे.
उन्हाळ्यात सुरू असलेल्या टँकरचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. ४० वर्षांत प्रथमच यंदा सर्वात जास्त पावसाची नोंद जून महिन्यात झाली आहे. यामुळे तालुक्यातील बळीराजा सुखावला असून, दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जमिनीत वाफसा होऊ लागल्याने पेरणीची लगबग सुरू झालेली आहे.
अधिक वाचा: Weather Update Maharashtra ३० जूनपर्यंत महाराष्ट्रात या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता