उजनी धरण यंदा केवळ ६६ टक्केच भरले. अत्यल्प झालेल्या पावसामुळे हे संकट ओढवले आहे. त्यातच कालवा सल्लागार समिती, उजनी धरण व्यवस्थापन यांच्या ढिसाळ नियोजनामुळे मागील एक ते दीड महिन्यात सोडलेल्या बेहिशेबी पाण्यामुळे उजनी धरण ६६ टक्क्यांवरून बघता बघता २५ टक्क्यांवर आले आहे. उजनीचा कालवा, भीमा-सीना जोडकालवा, सीना माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना यातून दररोज ५००० क्युसेक पेक्षा जास्त पाणी कमी होत आहे.
डिसेंबर संपण्यापूर्वीच अशी अवस्था असेल तर फेब्रुवारी ते जून अखेर सहा महिने आपले कसे होणार? या चिंतेने उजनी काठचा शेतकरी धास्तावला आहे तत्काळ सर्व लोकप्रतिनिधींकडून यावर हालचाल करणे आवश्यक असल्याची भावना लोकांची असून कुणीच याबाबतीत पुढाकार घेत नसल्याने संताप आहे. सोलापूर जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन तत्काळ कालवा सल्लागार समिती व उजनी धरण व्यवस्थापन यांनी धरणग्रस्तांवर अन्याय होऊ नये व काटेकोर पाणी नियोजन करावे अशी मागणी केली आहे. उजनी धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्याला धक्का लागता कामा नये. त्यांच्यावर वीज कपातीचे संकट येता कामा नये यासाठी शासनालाही अवगत करण्यासाठी शुक्रवार, दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले जाणार आहे.
गेल्या ५१ दिवसात धरणातून कालव्याद्वारे ३ नोव्हेंबर पासून पाणी सोडण्यात येत असून बोगद्याद्वारे ५ नोव्हेंबर पासून पाणी सोडण्यात आलेले आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी आजही पाणी सोडण्यात येत आहे. आजच्या परिस्थितीत धरणात २७.५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे असेच पाणी सोडण्यात आले तर साधारणता पुढील महिन्यात जानेवारी २४ मध्ये धरण मायनस मध्ये जाईल.
धरणावर ८ लाख हेक्टर अवलंबून
उजनी धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्याच्या सुमारे ८ लाख हेक्टर शेतीच्या सिंचनाचे भवितव्य अवलंबून आहे, तर पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील ४५ ते ५० साखर कारखाने, १५च्या वर औद्योगिक वसाहती, सीनारमास सारखे चार ते पाच मोठे उद्योग, सोलापूर, धाराशिव, इंदापूर, बार्शी, पंढरपूर, कुडूवाडी यास अनेक शहर व ग्रामीण पाणीपुरवठा योजनाही उजनीच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. त्यामुळेच उजनी शंभर टक्के भरले नाही तर भविष्यात पाणीबाणी निर्माण होऊ शकते.
मागील वर्षी १११ टक्के भरले होते धरण
- सोलापूर जिल्ह्याच्या कृषी, आर्थिक, सहकार व राजकीय क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असलेले उजनी धरण चालू वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत ३६ दिवस अगोदरच ३६ टक्के मायनस झाले होते. उजनी धरण मागील वर्षी पूर्ण क्षमतेने म्हणजे १११ टक्के भरले होते.
- १७ जानेवारी २०२३ पर्यंत धरण १०० टक्के भरलेले होते त्यावेळी धरणात तब्बल ११७ टीएमसी जलसाठा उपलब्ध होता, तर उपयुक्त साठाही ५३०५७ टीएमसी होता. मागील वर्षी १५ ऑक्टोबर २०२२ ते ६ मे २०२३ या कालावधीत धरणातील ६० टीएमसी पाणी वापरण्यात आले होते, तर सुमारे १४ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले होते.