टेंभुर्णी: उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून उन्हाळी हंगामातील पहिली पाळी दुपारी १ वाजता ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला असून, कालव्यातून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.
सध्या उजनी धरणाचीपाणीपातळी ४८.३१ टक्के असून, धरणात २५.८८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगामातील पाणी पाळी १४ फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आली होती.
२२ दिवसांनंतर पुन्हा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी १६ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. १६ एप्रिलनंतर दुसऱ्या उन्हाळी पाळीचा निर्णय होणार आहे.
सध्या उजनी धरणातून सीना माढा उपसा सिंचन योजनेतून ३३३ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. भीमा-सीना जोड कालव्यातून ८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.
बोगद्यातून व कालव्यातून टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. सध्या धरणात एकूण ८९.५४ टीएमसी पाणीसाठा आहे.
दोन महिन्यांची चिंता मिटली
एप्रिल अखेरीस भीमा नदीकाठचा व सोलापूर शहरासाठी पाणी सोडले जाऊ शकते. कारण टाकळी बांधाऱ्यात दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहतो. सध्या सोडलेले पाणी एप्रिल अखेरपर्यंत पुरणार असून, पुढील दोन महिन्यांची चिंता मिटली आहे.
अधिक वाचा: राज्यात या नऊ समूहांकडे एकवटल्या साखर उद्योगाच्या नाड्या; वाचा सविस्तर