टेंभुर्णी : भीमा खोऱ्यातील २० पैकी १९ धरणात ४०.६६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मुळशी ८.२९ टीएमसी, वरसगांव ५.३५, पानशेत ५.८९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर भीमा खोऱ्यातील उजनी धरणात वजा १२ टीएमसी पाणीसाठा आहे.
नीरा खोऱ्यातील चार धरणात २३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये भाटघर ११.०४ टीएमसी, वीर ४.७९, नीरा देवघर ४.८७ तर गुंजवणी २.३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.
भीमा खोऱ्यातील धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने कळमोडी धरण शंभर टक्के भरले असून या धरणातून २ हजार क्युसेक विसर्ग नदीत सोडण्यात आला होता. वडीवळे व खडकवासला धरणे शंभर टक्के भरण्याचा मार्गावर असून उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात वाढ होऊन ८ हजार ५१६ क्यूसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे.
तर बंडगार्डन येथून ४ हजार ३५९ क्युसेक विसर्ग सुरू आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता उजनी धरणाची पाणी पातळी वजा २२.९६ टक्के झाली आहे.उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर येण्यासाठी आणखी १२ टीएमसी पाण्याची गरज आहे. भीमा खोऱ्यातील धरणे भरत आल्याने उजनी धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
उजनी पाणलोट क्षेत्रात २४८ मिमी पावसाची नोंद
गतवर्षी २१ जुलै रोजी वजा ३२.४३ टक्के पाणीपातळी होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ९ टक्के अधिक पाणीपातळी वाढली आहे. तर गतवर्षी १ ऑगस्ट २३ रोजी उजनी मृतसाठ्यातून बाहेर आले होते. सध्या वर्षभराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी उजनी कधी मृतसाठ्यातून बाहेर येते. याकडे शेतकऱ्यांना आशा लागून राहिल्या आहेत. उजनी पाणलोट क्षेत्रात २४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.