टेंभुर्णी : उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात किंचीत वाढ झाली आहे. २ हजार १७१ क्युसेक असून यामुळे उजनी धरणाचीपाणी पातळी वाढण्यासाठी मदत होणार असून सध्या उजनी धरणाची पाणी पातळी वजा ४० टक्के झाली असून गेल्या एक महिन्यात २० टक्के पाणी उजनीत जमा झाले आहे. तर १२ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंडचा विसर्ग कमी-जास्त प्रमाणात का होईना गेल्या २५ दिवसांपासून सातत्याने चालू आहे. तर उजनी पाणलोट क्षेत्रात जून महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे यंदा उजनी पाणी पातळी वधारली असली तरी वजा पातळीतून यायला बराच कालावधी लागू शकतो.
उजनी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी भीमा खोऱ्यात दमदार पावसाची गरज भासणार आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी दौंड येथील विसर्गात घट झाली होती. रविवारी व सोमवारी पडलेल्या पावसाने दौंड विसर्गात किंचीत वाढ झाली आहे.
चालू हंगामात १० जून रोजी दौंड पाणी पातळी सर्वाधिक ७ हजार ९५४ क्युसेक पर्यंत वाढली होती. त्यानंतर सातत्याने पाणी पातळी कमी होत गेली; मात्र गेल्या २५ दिवसांत दौंड येथून सातत्याने विसर्ग मिसळत आहे. सध्या उजनी धरणात ४२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.