मागील २४ तासात उजनी धरणात पावणे तीन टीएमसी पाणी आल्याने उजनी अखेर ५० टक्के भरले असून, एकूण साठा ९१ टीएमसी एवढा झाला आहे. उजनी शंभर टक्के भरण्यासाठी २६ टीएमसी पाण्याची गरज आहे. उजनी ५० टक्के होताच माढा व करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सीना माढा उपसा सिंचन व दहिगाव उपसा योजनेतून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. उजनी ५० टक्के भरल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला आहे.
उजनी धरण ५० टक्के भरल्याने शेतकरी सुखावला असला तरी पुणे जिल्ह्यात पडणारा पाऊस पूर्णपणे थांबला असल्याने वरील धरणातून येणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या वरील ७ धरणातून केवळ ५,२४९ क्युसेकने विसर्ग चालू आहे. त्यामुळे बंडगार्डन व दौंड येथून येणाऱ्या विसर्गामध्येही मोठी घट झाली आहे. सोमवारी सायंकाळी दौंड येथून २९,८५० क्युसेकने येणारा विसर्ग मंगळवारी सकाळी २३.६२२ क्युसेक झाला, तर सायंकाळी तो १८,१७५ क्युसेक झाला आहे. बंडगार्डन येथून येणारा विसर्ग कमी होऊन तो ११,७३१ झाला आहे. वरून येणारा विसर्ग कमी झाल्याने व उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस थांबल्यामुळे मागील तीन- चार दिवस झपाट्याने वाढणाऱ्या पाणी पातळीस ब्रेक लागणार आहे.
कालवा पाणी वाटप कमिटीच्या बैठकीत सीना माढा व दहिगाव या दोन उपसा सिंचन योजनांमधून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांनी केली होती. परंतु, धरणात अत्यल्प पाणी असल्याने त्यावरील निर्णय लांबणीवर पडला होता. मात्र, धरण ५० टक्के होताच पाणी सोडण्यात आले आहे.
कुरनूर धरणाकडे लक्ष
पावसाळा संपत आला तरी कुरनूर धरणातील पाणीसाठा जैसे थेच राहिला होता. रविवारी रात्री उत्तरा नक्षत्रातील पावसाने तालुक्याच्या उत्तर भागात व धरणाच्या लाभक्षेत्रात दमदार हजेरी लावल्याने एकाच दिवसात कुरनूर धरणात तब्बल ३० टक्के पाणीसाठा झाला. यामुळे पावसासाठी धास्तावलेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. कुरनूर धरणात बोरी व हरणा नदीद्वारे कमी-जास्त प्रमाणात धरणामध्ये पाणी येत आहे. धरणातील पाणीपातळी वाढण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. कुरनूर धरण क्षमतेने न भरल्यास अक्कलकोट शहरासह तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना अडचणीत येणार आहेत.
धरणाची सद्यस्थिती
• एकूण पाणी पातळी ४९४.३३५ मीटर
• एकूण जलसाठा ९०.६३ टीएमसी
• उपयुक्त साठा २६.९७ टीएमसी
• टक्केवारी ५०.३५
इन्फ्लो
बंडगार्डन ११,७३१ क्युसेक
• दौंड १८,१७५ क्युसेक
इन्फ्लो
सीना-माढा २२२ क्युसेक
दहिगाव उपसा ८० क्युसेक