Join us

Ujani Dam पावसाची विश्रांती.. दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट, उजनीत आलं किती पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 9:54 AM

उजनी धरणात दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट झाली असून एक हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. मागील दोन दिवसात दौंड येथील विसर्गात वाढ झाली होती.

टेंभुर्णी : उजनी धरणातदौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट झाली असून एक हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. मागील दोन दिवसात दौंड येथील विसर्गात वाढ झाली होती. सध्या भीमा खोऱ्यातील पाऊस थांबल्याने दौंड विसर्गात घट होत आहे.

शुक्रवार, २८ रोजी सायंकाळी ६ वाजता १ हजार १५४ क्युसेक इतका सुरू होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे दौंड विसर्ग ३ हजार क्युसेकपर्यंत वाढला होता. गुरुवारी सकाळी ३ हजार १०० क्युसेक तर शुक्रवारी सकाळी घट होऊन १ हजार ४०० क्युसेक इतका झाला होता.

सायंकाळी पुन्हा घट होत गेली. दोन दिवसांपूर्वी उजनी पाणीपातळीत वाढ होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात घट झाली आहे.

सध्या उजनी पाणीपातळी वजा ४२.५२ टक्के झाली असून ४०.८२ टीएमसी पाणीसाठा उजनी धरणात आहे. उजनी पाणीपातळी वाढण्यासाठी भीमा खोऱ्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे

टॅग्स :उजनी धरणधरणसोलापूरपाणीदौंडपाऊसपुणे