गणेश पोळटेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाचा बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. १ मार्चपासून १.२० टीएमसी पाणी बाष्पीभवनाने कमी झाले असून ३० जूनपर्यंत आणखी अडीच टीएमसी पाणी बाष्पीभवनाने कमी होणार आहे. 'उजनी'तील वर्षाला अंदाजे ८ ते १० टीएमसी पाणी बाष्पीभवन होत असते, अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापक प्रशांत माने यांनी दिली.
सध्या उजनी धरणात ४२.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर वजा ३९.३४ टक्के पाणीपातळी खलावली आहे. १२१ टीएमसी क्षमता असलेले उजनी धरण राज्यातील सर्वाधिक मृतसाठ्यातील ६३.६६ टीएमसी क्षमता असलेले म्हणून ओळखले जाते.
यावर्षी उजनी धरणात ९६.१५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर ३२.५० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे. १५ मेदरम्यान सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.
त्यानंतर जुलै महिन्यात आषाढी वारीसाठी उजनीतून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी जून महिन्यात ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत पाणीपातळी जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या दररोज ०.२३ टक्के पाणीपातळी कमी होत आहे.
पुढील हंगामातील मान्सून भीमा खोऱ्यात कधी दाखल होतोय यावरच उजनी धरणाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. उजनी धरण मृतसाठ्यातून बाहेर येऊन उजनी ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्यावर शेतीसाठी पाणी मिळण्याची शक्यता असते. यासाठी जुलै ते ऑगस्ट महिना लागण्याची शक्यता असून आणखी चार महिने तरी शेतीला पाणी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
मागील चार वर्षांतील १५ एप्रिलनंतरची स्थिती■ २३ एप्रिल २१ रोजी- १८.५७■ १६ एप्रिल २०२२ - २८.५५■ १६ एप्रिल २०२३ - १५.९४■ १६ एप्रिल २०२४ - वजा ३९.५७ टक्के
सोलापूर, पुणे व अहमदनगर या तीन जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरणाने तळ गाठला असून सध्या धरणात ४२.५८ टिएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला असून सध्या ३९ टक्के असलेले उजनी जून महिन्यात वजा ५५ ते ६० टक्के पर्यंत खाली जाण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
अधिक वाचा: उजनी धरणात हे केलं तर वाढेल ६ टीएमसी पाणीसाठा अन् शेतकऱ्यांच्या जमिनी होतील कसदार