गणेश पोळ
टेंभुर्णी : भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे येथील बंडगार्डन येथून सायंकाळी ७ वाजता १ लाख २ हजार २२८ क्युसेक तर दौंड येथून ९८ हजार ८४० क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता.
गेल्या ५३ दिवसात ३२ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. बंडगार्डन येथील विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने दौंड येथील विसर्ग मध्यरात्री दीड लाख क्यूसेकच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचे उजनी धरण व्यवस्थापक सहायक अभियंता प्रशांत माने यांनी दिली.
शुक्रवारी उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर येऊन उपयुक्त पाणी पातळीकडे वाटचाल करणार आहे. सकाळी १० वाजता बंडगार्डन येथील विसर्ग १ लाख ५ हजार क्यूसेकवरती पोहचला होता. दुपारनंतर त्यात थोडी घट झाली.
सकाळी बंडगार्डन येथील वाढलेल्या विसर्गाचे पाणी दौंड येथे पोहचायला १० ते १२ तास कालावधी लागणार आहे. रात्री दहानंतर दौंड विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. दि. २६ रोजी शुक्रवारी सकाळी दौंड विसर्ग दीड लाख क्यूसेकपर्यंत जाण्याचा अंदाज असून गुरुवार दिवसभरात ६ टक्के पाणी पातळी वाढली आहे.
शुक्रवारी दुपारपर्यंत उजनी मृत साठ्यातून बाहेर येणार असून गतवर्षीपेक्षा चार दिवस आधी उजनी मृत साठ्यातून बाहेर पडणार आहे. यावर्षी उजनी धरण पाणीसाठा ३१.५६ टीएमसी शिल्लक राहिला होता. रात्री १० वाजता वजा ८.८३ टक्के पाणी पातळी झाली होती. शेतीसाठी उजनी शंभर टक्के भरण्याची गरज आहे.
सात धरणातून पाणी
खडकवासला धरणातून १५ हजार, मुळशी १० हजार ७००, कासारसाई ४ हजार ५००, वडीवळे १० हजार, कळमोडी ७ हजार ५३९, चिलईवाडी २ हजार, वडज ५ हजार क्यूसेक या सात धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. माणिकडोह, विसापूर व घोड धरण वगळता भीमा खोयातील सर्व धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
पाच दिवस आधीच मृत साठ्यातून बाहेर
गतवर्षी १ ऑगष्ट २३ रोजी मृत साठ्यातून बाहेर, १५ ऑक्टोबर २३ रोजी अधिक ६०.६६ टक्क्यांवर स्थिर, २१ जानेवारी २४ पासून मृत साठ्यात, ४ जून २४ रोजी वजा ५९.९९ टक्केपर्यंत पातळी खालावली होती. शुक्रवार दि. २६ जुलै मृत साठ्यातून बाहेर येणार आहे.