गणेश पोळ
टेंभुर्णी: भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे यावर्षी उजनी धरणातून सोमवारी सायंकाळी सव्वा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आला होता. २०२० नंतर प्रथम लाखाच्या वरती एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला.
उजनी धरणात आत्तापर्यंत ९ वेळा दौंड येथून १ लाख क्युसेक पर्यंत विसर्ग उजनी धरणात आला आहे. तर उजनीतून भीमा नदीत व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने संगम व पंढरपूर येथेही सर्वाधिक पाणी पातळीची नोंद झाली आहे.
दौंड येथून १९८३ साली सर्वाधिक ३ लाख ४५ हजार क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग उजनीत आला होता. १९९७ व २००६ मध्ये उजनीतून २ लाख ७५ हजार क्युसेक हा सर्वाधिक विसर्ग सोडण्यात आला होता.
तर २००५ व २००६ मध्ये पंढरपूर येथील धोका इशारा पातळी ओलांडली होती. ३ लाख २४ हजार क्युसेक विसर्ग हा धोका पातळी समजला जातो तर संगम येथील ३ लाख १९ हजार क्युसेक धोका पातळीत धरला जातो. वीर व भीमा नदीचा निसर्ग निरा नृसिंहसपूर येथे एकत्र आल्यास संगम व पंढरपूर येथील पाणी पातळीत वाढ होते.
सध्या भीमा नदीत २० हजाराचा विसर्ग
सध्या दौंड येथून १३ हजार ७७६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. भीमा नदीतून २० हजार क्युसेक विसर्ग आहे. वीज निर्मिती १ हजार ६००, उजनी कालवा १ हजार ९०० क्युसेक, भिमा-सिना जोड कालवा ९०० क्युसेक, सिना-माढा उपसा सिंचन योजना २१० क्युसेक तर दहिगाव उपसा सिंचन योजनेतून १०० क्युसेक सोडण्यात येत आहे. सध्या उजनीची पाणी पातळी १०४.२४ टक्के असून एकूण ११९.५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर ५५. ८४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
आतापर्यंत सर्वाधिक विसर्ग (क्युसेकमध्ये)
सन | दौंडमधून आलेला विसर्ग | उजनीतून भीमेतील विसर्ग |
१९८३ | ३ लाख ४५ हजार ७६९ | २ लाख ४५ हजार क्युसेक |
१९९४ | २ लाख ५४ हजार २६८ | २ लाख १७ हजार |
१९९७ | २ लाख ७५ हजार ४५७ | २ लाख ७५ हजार |
२००५ | २ लाख ४३ हजार ६७३ | २ लाख २५ हजार |
२००६ | २ लाख ५४ हजार १३८ | २ लाख ७५ हजार |
२००८ | १ लाख ४१ हजार ८३ | १ लाख १ हजार |
२०११ | १ लाख ४१ हजार ३९६ | १ लाख ३० हजार |
२०१९ | २ लाख २२ हजार ४८८ | १ लाख ८० हजार |
२०२० | ७३ हजार ९२६ | २ लाख ५० हजार |