गणेश पोळ
टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले उजनी एप्रिल, मे महिन्याच्या दरम्यान मृत साठ्यात जाते. यानंतर शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद होते. मे व जून या पुढील दोन महिन्यांत पिके कशी जगवायची, असा प्रश्न निर्माण होतो.
बॅक वॉटरवरील उजनी धरणाचेपाणी जसजसे खाली जाईल, तसे पाइप व केबल वाढवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत असते. त्यामुळे उजनी शंभर टक्के तर भरते मात्र पावसाळ्याचा तोंडावर चिंताजनक स्थिती निर्माण होते.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा उजनी लवकर शंभर टक्के भरले आहे. गतवर्षी उजनी ६०.६६ टक्के भरल्याने जानेवारी महिन्यात वजा पातळीत गेले होते. पावसाळा संपल्यानंतर रब्बी हंगामातील पाळी कधी सुटते यावर पुढील उन्हाळ्यातील उजनीच्या पाण्याचे नियोजन अवलंबून राहणार आहे.
उजनी शंभर टक्के भरले तरी नियोजन गरजेचे आहे, गत दोन वर्षांपूर्वी पावसाळा लांबल्याने रब्बी पाणीपाळी लांबली होती; मात्र गतवर्षी सलग तीन महिने रब्बी हंगामात पाणी सोडल्याने उन्हाळी हंगामात पाणी मिळू शकले नाही.
पावसाळा आणखी दोन महिने शिल्लक असल्याने पुढील दोन महिने उजनी मुख्य कालवा, भीमा-सीना जोड कालवा व उपसा सिंचन योजनेतून पाणी चाल राहण्याची शक्यता आहे.
उजनी धरणातील पाणी वाटपाची सध्याची स्थिती
■ शिरापूर योजना - १.७३ टीएमसी
■ आष्टी - १ टीएमसी
■ सांगोला - २ टीएमसी
■ लाकडी निंबोळी - ०.९० टीएमसी
■ मंगळवेढा - २.४ टीएमसी
■ एकरूख - ३.१५ टीएमसी हे पाणी उजनी मुख्य कालव्यातून दिले जाते.
■ मुख्य कालवा - ३२.८८ टीएमसी
■ सीना-माढा उपसा सिंचन योजना - ४.७५ टीएमसी
■ दहिगाव योजना - १.८० टीएमसी
■ भीमा-सीना जोड कालवा - ३.१६ टीएमसी
दोन्ही हंगामात १४. ६७ टीएमसी बाष्पीभवन
● खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात मिळून १४.६७ टीएमसी पाणी बाष्पीभवन होते. एकूण अंदाजे १४ टीएमसी पर्यंत गाळ आहे. मृतसाठ्यात आठ टीएमसी तर जिवंत पाण्याच्या साठ्यात ६ टीएमसी गाळ गृहित धरण्यात येतो. सध्या उजनी धरणात एकूण १२०.४७ टीएमसी पाणीसाठा आहे. उपयुक्त ५६.८१ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे.
● उजनी समांतर जलवाहिनी सप्टेंबर अखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर भीमा नदीत किती टीएमसी पाणी जाणार याचे गणित अवलंबून असणार आहे. यात भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याची तरतूद नसली तरी सोलापूर शहरासह पिण्याचा पाण्यासाठी १८ टीएमसीपर्यंत तीन पाळ्यात नदीत पाणी सोडण्यात येते.
● सध्या उजनी धरणाची टक्केवारी १०६.०४ आहे. तर दौंड येथून ९ हजार ८१४ क्युसेक विसर्ग सुरू असून उजनीतून भीमा नदीत १५ हजार, वीज निर्मिती १ हजार ६००, मुख्य कालवा २ हजार २००, सीना-माढा उपसा सिंचन २१० क्युसेक, दहिगाव ८० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.