सोलापूर : जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार गुरुवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी उजनी धरणातून भीमा नदीतपाणी सोडण्यात येणार आहे. आदेशाप्रमाणे विसर्गात आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जलसंपदा विभागाच्या (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांच्या आदेशानुसार भीमा नदीवरील पिण्याचे पाणी आवर्तन क्रमांक १ प्रमाणे गुरुवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उजनी धरणाच्या सांडवा द्वारातून २ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू होणार आहे.
सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगरपरिषद व भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतींसाठी पिण्याचे पाणी योजनांसाठी उजनीतून पाणी सोडण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार टप्प्याटप्याने वाढ करण्यात येणार आहे.
भीमा नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व इतर विद्युत साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलवावेत.
तसेच सखल भागातील संबंधित नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात यावी. नदीकाठच्या गावकऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने केली आहे.
अधिक वाचा: पाण्याच्या शोधात आलेला वाघ वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कसा झाला कैद; वाचा सविस्तर