टेंभुर्णी: उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मोठी वाढ झाली असून दौंड येथून ९३ हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. तर उजनीतून भीमा नदीत १६ दरवाजातून ८१ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उजनी धरणाचीपाणी पातळी स्थीर ठेवण्यासाठी जेवढे दौंड येथून विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे, तेवढाच भीमा नदीत सोडण्यात येत आहे.
सध्या उजनी धरणाची पाणी पातळी १०४.९१ टक्के असून धरणात ११९.९६ टीएमसी पाणीसाठा आहे. तर ५६.२० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. रविवारी रात्री ७१ हजार ६०० क्युसेक विसर्ग उजनीतून सोडण्यात येत होता.
सकाळी ९ वाजता १० हजार क्युसेकने घट करून ६१ हजार ६०० क्युसेक करण्यात आला होता. मात्र दौंड येथील विसर्गात सोमवारी सकाळपासून पुन्हा वाढ होत गेल्याने दुपारी उजनीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली.
सध्या उजनीतून मुख्य कालवा १ हजार ६०० क्युसेक, भीमा-सिना जोड कालवा २०० क्युसेक, सिना-माढा उपसा सिंचन योजनेतून १७५ क्युसेक, दहिगाव ८० क्युसेक तर वीज निर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत आहे. धरणातील पाणी पातळी १०४ टक्के झाली असून ११९.९६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
पुढील दोन दिवस विसर्ग सुरूच राहणारपुणे जिल्ह्यातील भीमा खोरे परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून भीमा खोऱ्यातील बहुतांशी धरणे ओव्हर फ्लो झाली असल्याने भीमा खोऱ्यातील पावसाचे पाणी थेट उजनी धरणात मिसळत आहे. आणखी दोन दिवस असाच विसर्ग सुरू राहणार आहे.