टेंभुर्णी : दौंड येथून उजनी धरणात मिसळणाऱ्या विसर्गात थोडी वाढ झाली असून, दौंड येथून १२ हजार ११८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीपात्रात १० हजार क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे.
वीजनिर्मिती १ हजार ६०० क्युसेक, मुख्य कालवा २ हजार क्युसेक, भीमा-सीना जोड कालवा ९०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजना २१० क्युसेक, दहिगाव ८० क्युसेक, असा एकूण १३ हजार ८९० क्युसेक विसर्ग उजनीतून शेतीसाठी सोडण्यात येत आहे.
सध्या उजनी धरणाची पाणीपातळी १०६.२६ टक्के आहे. भीमा खोऱ्यातील जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली असली तरी भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतलेली आहे, सध्या जेवढा दौंड येथून विसर्ग येत आहे. तेवढा उजनीतून सोडण्यात येत आहे.
तासाला १२ हजार युनिट वीज निर्मितीगेल्या आठ दिवसांपासून उजनी धरणातून वीज निर्मिती सुरू असून १ हजार ६०० क्युसेक पाणी यासाठी सोडण्यात येत आहे. तासाला १२ हजार युनिट याप्रमाणे वीज निर्मिती सुरू आहे. त्यातून एका दिवसाला सध्या दररोज एक लाख ८८ हजार युनिट वीज निर्मिती होत आहे.