टेंभुर्णी : भीमा खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील पाच धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. उजनी धरणावरील चार धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. बंडगार्डन येथून २७ हजार ६२७ क्युसेकची आवक मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दौंड येथील विसर्ग २३ हजार क्युसेकपर्यंत पोहोचला आहे. गुरुवारी ३५ ते ४० हजार क्युसेकपर्यंत दौंड विसर्ग वाढण्याचा अंदाज उजनी धरण व्यवस्थापक सहायक अभियंता प्रशांत माने यांनी दिला आहे.
बुधवार दि. २४ रोजी सायंकाळी ६ वाजता उजनी धरणाचीपाणी पातळी वजा १७.०७ टक्के झाली आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर निघण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणातून सकाळी १० हजार क्युसेक विसर्ग सुरू होता.
सायंकाळी ३ हजार क्युसेकने कमी करण्यात आला आहे. कासारसाई धरणातून पुढील २४ तासात विसर्ग सोडण्याचा इशारा प्रशासनाचा वतीने देण्यात आला आहे. तर नीरा खोऱ्यातील वीर धरणातून पुढील ४८ तासात पाणी सोडण्याचा इशारा धरण व्यवस्थापनाने दिला आहे.
भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे गेल्या तीन दिवसांत उजनी धरणाची पाणी पातळी सहा टक्क्यांनी वाढली आहे. सध्या धरणात ५४.५२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. उजनी उपयुक्त पाणी पातळीत येण्यासाठी आणखी ९ टीएमसी पाण्याची गरज असून उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी ६२ टीएमसी पाण्याची गरज आहे. पावसाळा आणखी दोन महिने शिल्लक असल्याने उजनी पूर्ण क्षमतेने भरण्याचा आशा निर्माण झाल्या आहेत.
चार वर्षांत जुलैमध्येच धरण मृत साठ्यातून बाहेरएप्रिल ते मे महिन्यात मृत साठ्यात जाणारे उजनी धरण साधारण जुलै अखेरपर्यंत मृत साठ्यातून बाहेर येत असते. गेल्या चार वर्षांत उजनी जुलै महिन्यात मृत साठ्यातून बाहेर निघाले आहे. १८ जुलै २०२०, २२ जुलै २०२१, १२ जुलै २०२२, १ ऑगस्ट २०२३ रोजी उजनी मृत साठ्यातून बाहेर आले होते.
भीमा खोऱ्यातील पाच धरणे ओव्हर फ्लोभीमा खोऱ्यातील पाच धरणे ओव्हर फ्लो झाली असून खडकवासला, कासारसाई, वडीवळे व कळमोडी, चिलईवाडी ही पाच धरणे शंभर टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातून ७ हजार ४१०, वडीवळे २ हजार १७६, कळमोडी १ हजार ६०७, चिलईवाडी २ हजार ३१७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. या चार धरणातून एकूण १३ हजार ३१७ क्युसेक सोडण्यात येत आहे.