टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण मध्यरात्री ५० टक्के भरले आहे. उजनी धरणाने शंभरीकडे वाटचाल केली आहे. सध्या दौंड येथील विसर्ग ३३ हजार १६७ क्युसेक सुरू आहे.
खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आल्याने बंडगार्डन येथील विसर्गात घट होत गेली आहे. परिणामी, दौंड येथील विसर्गात सकाळपासून घट होत जाणार आहे.
बंडगार्डन येथून १५ हजार ९७४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. रात्री ९ वाजता उजनी धरणाचीपाणी पातळी ४९ टक्के झाली होती. मंगळवार सकाळपासून दौंड येथील विसर्ग ३० हजाराच्या आसपास स्थिर राहिल्याने दर तीन तासाला उजनी धरणाचीपाणी पातळी एक टक्क्याने वाढत होती.
मंगळवारी सकाळी सहा वाजता उजनीची पाणी पातळी ४४.४९ टक्के झाली होती. सायंकाळी सहा वाजता ४८.०५ टक्के झाली होती. सध्या उजनी धरणात एकूण ९० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. २६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
उजनी पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरण्यासाठी आणखी ३३ टीएमसी पाण्याची गरज आहे. भीमा खोऱ्यातील पाऊस थांबल्याने भीमा खोऱ्यातील सोडण्यात येणाऱ्या विसर्गात घट झाली आहे. सध्या येणाऱ्या दौंडचा विसर्ग पाहता उजनी धरणाची पाणी पातळी संथगतीने का होईना ६० टक्क्यांपर्यंत जाणार आहे.
ओढे, नाले तलाव भरून घेता येईल..
पुणे जिल्ह्यात १५ जुलैपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात वाढ होऊन मृत साठ्यातून जिवंत पाणीसाठ्यात धरणातील पाणीपातळी आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच भागात अपेक्षित पाऊस झालेला नसल्यामुळे ओढे, नाले, तलाव कोरडेच आहेत. पिण्यासहीत शेतीच्या पाण्याचीही कमतरता भासत आहे. मागील वर्षी पाण्याची खूपच कमतरता भासली होती; तरीपण मागील उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी अडचणींना तोंड देत सांभाळलेल्या पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. यापूर्वी उजनी धरणात ३३ टक्के पाणीपातळी होताच डावा उजवा कालवा भीमा-सीना बोगदा व सीना-माढा सिंचन योजना यातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडलेले होते. त्याचप्रमाणे आताही ओव्हरफ्लो होणारे पाणी विसर्गस्रोतातून सोडता येणार आहे.
ओव्हरफ्लो पाणी कालवा, बोगद्यातून सोडा
उजनी धरणात ओव्हरफ्लो होणारे पाणी डावा-उजवा कालवा, बोगद्यातून सीना नदीत व सीना-माढा सिंचन योजना या स्रोतातून सोडण्यात यावे. माढा विधानसभा मतदारसंघात असणारे ओढे, नाले, तलाव भरून द्यावेत व गावोगावची पिण्याच्या आणि शेतीसाठी पाण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विभाग, पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली केली आहे.