टेंभुर्णी : उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मोठी घट झाली असून रात्री ९ वाजता १७ हजार ६९८ क्युसेक विसर्गाने पाणी उजनी धरणात मिसळत आहे. सध्या उजनी धरणाचीपाणी पातळी ३८.५७ टक्के झाली असून एकूण ८४.३२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दोन दिवसांपासून दौंड येथील पाणी पातळी घटत गेली आहे. सायंकाळी ५ वाजता बंडगार्डन येथून १३ हजार ८७३ क्युसेक विसर्ग सुरू होता.
रात्री १० वाजता खडकवासला धरणातून १२ हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात येणार असून उद्या बंडगार्डन येथील विसर्गात वाढ होणार आहे. यामुळे दौंड येथील विसर्गात थोड्याफार प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळपर्यंत उजनी ४० टक्के पार करणार असून या विसर्गावर ५० टक्क्यांजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. पावसाळा आणखी दोन महिने शिल्लक असल्याने उजनी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता यावर्षी दिसून येत आहे. उजनी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने जिल्ह्यातील ऊस लागवडीसाठी शेतकरी गडबड करताना दिसून येत आहेत.
३३ दिवसांत ५० टीएमसी पाणी
पुण्यात आलेल्या पुराचा फायदा उजनीला झालेला आहे. दोन दिवसांत उजनीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. मागील ३३ दिवसांत उजनी धरणात ५० टीएमसी पाणी आले आहे. उजनी ओव्हरफ्लो होण्यासाठी आणखी ३८ टीएमसी पाण्याची गरज आहे. पुढील काही दिवसांत पुण्यात आणि भीमा खोऱ्यात पावसाचा जोर वाढल्यास लवकरच धरण १०० टक्के भरणार आहे.
वीर धरणातून २४ हजार क्युसेकचा विसर्ग
● नीरा खोच्यातील डोंगरमाथ्यावर पावसाचा जोर आज पुन्हा वाढल्याने सकाळपासून नीरा नदीत १३ हजार ९११ ने पाण्याचा विसर्ग सुरू होता तो वाढवून सायंकाळी ६ वाजता २४ हजार ३८५ करण्यात आला आहे.
● नीरा खोऱ्यातील नीरा-देवघर, येसाजी कंक जलाशय, गुंजवणी ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत तर वीर धरण भरले असून २५ रोजी सकाळी ११ वाजता पहिल्यांदा वीर धरण भरल्यानंतर
तीन दरवाजांमधून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. त्यानंतर अनेकवेळा पाण्याचा विसर्ग कमी-जास्त करण्यात आला. आतापर्यंत सर्वात जास्त ६१ हजार क्युसेसने नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. आज सायंकाळी ६ वाजता कमी केलेला पाण्याचा विसर्ग वाढवून २४ हजार क्युसेस करण्यात आला आहे.
आजची टक्केवारी
नीरा-देवघर धरणात ७९.७१ टक्के, भाटघर धरणात ८२.८२ टक्के, वीर धरणात ९७.४६ टक्के तर गुंजवणी धरणात ७१.०१ टक्के पाणीसाठा आहे.