Join us

Ujani Dam Water Level: उजनीत मागील ८ दिवसांत आलं किती पाणी.. धरण शंभरी पार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 10:09 AM

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात १०१ टीएमसी पाणीसाठा झाला असून पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी १६ टीएमसी पाण्याची गरज आहे.

टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात १०१ टीएमसी पाणीसाठा झाला असून पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी १६ टीएमसी पाण्याची गरज आहे. उजनी धरण शंभर टक्के भरण्यासाठी दोन पावले दूर आहे.

गेल्या आठ दिवसांत उजनी धरणात ३८ टीएमसीने वाढ झाली आहे.  शुक्रवार दि. २ रोजी सायंकाळी सात वाजता उजनी धरणाचीपाणी पातळी ७० टक्के झाली होती. उजनी शंभर टक्के भरण्यासाठी केवळ ३० टक्के राहिले आहे. तर दौंड येथून २४ हजार ७८८ क्युसेक विसर्ग उजनी धरणात सुरू आहे.

उपयुक्त पाणीसाठा ३७.२१ टीएमसी झाला आहे. गेल्यावर्षी उजनी धरणात ३५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. भीमा खोऱ्यातील धरण परिसरात सातत्याने पाऊस सुरू असल्याने दुपारी ४ वाजता मुळशी धरणातून १५ हजार २६४ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. 

खडकवासला धरणातून सायंकाळी सात वाजता २० हजार ६९१ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे बंडगार्डन येथून दौंड विसर्गात हे पाणी मिसळणार आहे. दिवसभरात पाच टक्के पाणी पातळी वाढली आहे. गेल्या शुक्रवारी उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर आले होते.

आठ ते नऊ दिवसांत ७० टक्के पाणी पातळी वाढली आहे. गतवर्षी ३ ऑगस्ट २०२३ रोजी उजनी धरणात केवळ ३ टक्के पाणी पातळी झाली होती. तर २०२२ मध्ये १२ ऑगस्ट रोजी उजनी धरण शंभर टक्के भरले होते.

टॅग्स :उजनी धरणधरणपाणीसोलापूरदौंडखडकवासलापाऊसपुणे