गणेश पोळ
टेंभुर्णी : भीमा खोऱ्यात पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. तर बंडगार्डन येथून २५ हजार २१८ क्युसेक विसर्ग चालू होता. सध्या दौंड येथे २१ हजार ३२२ क्युसेक विसर्ग सुरू असून मंगळवार सकाळपर्यंत दौंड येथील विसर्गात वाढ होणार आहे.
सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील ३० लाख लोकसंख्या, २ लाख पशुधन, किमान ५० साखर कारखाने, २५ औद्योगिक वसाहती, अनेक जलसिंचन योजना, पिण्याच्या पाणीपुरवठा योजना यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाचीपाणी पातळी मंगळवार दि. ३० जुलै सायंकाळपर्यंत ५० टक्के होणार आहे.
सोमवार दि. २९ रोजी सायंकाळी उजनी धरणाची पाणी पातळी ४२.०९ टक्के झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी उजनी ६६ दिवस अगोदर ५० टक्के भरणार आहे. यावर्षी ७ जूनपासून उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली होती.
तर भीमा खोऱ्यात सातत्याने पाऊस सुरू असल्याने ९ जूनपासून दौंड येथील विसर्ग कायम सुरू आहे. यामुळेच उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढू शकली. गेल्या आठवड्यात भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे सोमवारपासून उजनी धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.
पाच दिवसांत ५० टक्के भरत आले आहे. पानशेत धरणातून १५ हजार १३६ क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. यामुळे मुळा-मुठा नदीद्वारे बंडगार्डन येथून मोठ्या प्रमाणात विसर्ग भीमा नदीत मिसळत आहे. सध्या चासकमान येथून ५ हजार १४५ क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
आठ दिवसांत ६३ टक्के पाणी
● सोमवार दि. २२ जुलै रोजी सायंकाळी उजनी धरणाची पाणी पातळी वजा २१.३१ टक्के होती. गेल्या आठ दिवसांत ६३.०४ टक्के पाणी पातळी वाढली आहे. तर ५४.६९ टीएमसी पाणीसाठा ७ जूनपासून उजनी धरणात जमा झाला आहे. तर गेल्या आठ दिवसांत ३४.०९ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
● १५ ऑक्टोबर २३ रोजी ६०.६६ टक्के भरले होते. २१ जानेवारी मृत साठ्यात गेले होते. तर ७ जून २४ पर्यंत यावर्षी वजा ५९.९९ टक्के इतके सर्वाधिक खाली गेले होते. शुक्रवार दि. २६ जुलै २४ रोजी शून्य टक्के पाणी पातळी झाली होती प्लसकडे वाटचाल केली होती.