टेंभुर्णी: पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात मोठी घट झाली असून, उजनीतून भीमा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गातही झाल्याने, घट पंढरपूरवरील संकट तूर्तास तरी टळले आहे.
सध्या दौंड येथून ३३ हजार ५९० क्युसेक विसर्ग सुरू असून, उजनीतून भीमा नदीत ८१ हजार ६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. भीमा खोऱ्यातील जोरदार पावसामुळे सोमवारी सकाळी दौंड येथील विसर्ग २ लाख ८ हजार क्युसेकपर्यंत पोहोचला होता.
सोमवारी दुपारनंतर त्यात घट होत गेली. उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी १५ तासांपूर्वी सव्वालाख क्युसेकने भीमा नदीत विसर्ग सोडण्यात येत होता. दौंडमधील विसर्गात घट होत गेल्याने मंगळवारी दुपारी १२ वाजेपासून उजनीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात घट करण्यात आली आहे.
सध्या उजनी धरणात १२१.४४ टीएमसी पाणीसाठा झाला असून, १०७.४५ टक्के पाणीपातळी झाली आहे. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर आतापर्यंत दहा वेळा उजनी धरणातून १ लाख क्युसेकचा वरती विसर्ग सोडण्यात आला होता. पावसाने विश्रांती घेतल्याने भीमा नदीकाठचा गावांना दिलासा मिळाला आहे.
कालव्यातून सोडले पाणी
उजनी धरणातून कालव्याद्वारे १,३०० क्युसेक, भीमा-सीना जोड कालव्यातून ९०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून २१० क्युसेक, तर दहिगाव उपसा सिंचन योजनेतून १०० क्युसेक विसर्ग शेतीसाठी सोडण्यात येत आहे.