सोलापूर : यंदाच्या वर्षी समाधानकारक पडलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच धरणे, तलाव, ओढे, नाले, बंधारे समाधानकारक भरले असून सर्वत्र पाणीचपाणी दिसून येत आहे. मागच्या वर्षी ३१.०१ टक्के असलेले उजनी धरण सध्या १०६.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
उजनीसह अन्य धरणांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून यंदाच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यंदा भेडसावणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या औज, हिप्परगा धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.
यंदा सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला. जून, जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली. मात्र, परतीच्या पावसाने चांगला जोर दिल्याने सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे.
यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने शेतीपिके जोमात आली आहेत. ऊस, कांदा, भाजीपाल्यांना सध्या चांगला भाव मिळत आहे. यंदा उजनी धरण परिसरात ५८३ मिमी पाऊस पडला आहे. यंदा पावसाने सरासरीची पातळी ओलांडली आहे.
जिल्ह्यातील ५६ तलावांत पाणीच पाणी
लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांच्या अखत्यारीत येत असलेल्या लघु पाटबंधारे विभागातील होटगी, रामपूर, हणमगाव, बोरगाव, बीबीदारफळ, कारी, हंजगी, पोखरापूर, वडशिवणे, सांगवी, सातनदुधनी, लवंगी, जवळा, घेरडी, चिंचोली, सांगवी, चारे, वैराग, काटेगाव हंजगी आदी ५६ तलावांत २८०८.७७ (द.ल.घ.मी.) पाणीसाठा उपलब्ध आहे. उपयुक्त पाणीसाठा ७९.५४ तर एकूण पाणीसाठा ९४.२४ द.ल.घ.मी. एवढा आहे.
कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हाऊसफुल
सीना नदी व भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यात सध्या चांगला पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय भोोगवती नदी, माण नदी, बोरी नदी, निरा नदी, भीमा नदी, सीना नदी यासह आदी ठिकाणी पाण्याचा साठा मुबलक आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व शेततळ्यातही पाणीच पाणी दिसून येत आहे.
आकडेवारीवर एक नजर
प्रकल्प : उपलब्ध पाणीसाठा (टीएमसी)
उजनी : १०६.९४ टक्के
एकरूख : ८९.२४ टक्के
हिंगणी पा. : १०० टक्के
जवळगाव : ९३.८७ टक्के
मांगी : १०० टक्के
आष्टी : ७७.०१ टक्के
बोरी : ९८.८२ टक्के
पिंपळगाव ढाळे : १०० टक्के